झुकेगा नहीं साला; उदयनराजेंनी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीचं केलं कौतुक-video
By सचिन काकडे | Updated: November 15, 2025 15:57 IST2025-11-15T15:55:17+5:302025-11-15T15:57:02+5:30
शिवेंद्रसिंहराजे मिश्किलपणे म्हणाले...

झुकेगा नहीं साला; उदयनराजेंनी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीचं केलं कौतुक-video
सचिन काकडे
सातारा : साताऱ्याच्या राजकारणातील ‘बाहुबली’ म्हणून ओळखले जाणारे खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमीच चर्चेत असतात. पालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही राजेंमधील जवळीक वाढलेली असताना, त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओत उदयनराजे यांनी चक्क ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीचं कौतुक केल्याने वातावरण एकदम खुमासदार झालं आहे.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या कन्या ऋणालीराजे यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी बंधू उदयनराजे यांच्या ‘जलमंदिर’ या निवासस्थानी गेले होते. उदयनराजे यांनी स्वतः शिवेंद्रसिंहराजे यांचे उत्साहाने आणि आदराने आतिथ्य केले. पत्रिका दिल्यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. याचवेळी, उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीकडे पाहत ‘पुष्पा’ चित्रपटातील खास स्टाईलमध्ये कौतुक केले. उदयनराजेंची ही हटके स्टाईल पाहून दोन्ही राजेंना हसू आवरले नाही.
यावर शिवेंद्रसिंहराजेंनीही मिश्किलपणे, ‘तुम्ही देखील दाढी वाढवा काही बिघडंत नाही’, असे उत्तर दिले. या दिलखुलास संवादानंतर उदयनराजे यांनी पुन्हा एकदा शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या या कृतीतून ‘मोठा भाऊ कायम पाठीशी असेल’, असा आशावाद दिसून आला.
राजेंचा असाही निरोप
भेटीनंतर शिवेंद्रसिंहराजे जलमंदिरमधून बाहेर पडताना, दस्तुरखुद्द उदयनराजे यांनीच त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना निरोप दिला. या कृतीतून त्यांच्यातील आदर आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून आला. निवडणुकीच्या धामधुमीत दोन बंधूंमध्ये झालेला हा अनौपचारिक आणि खुमासदार संवाद साताऱ्याचे राजकीय वातावरण एकदम हलके-फुलके करून गेला आहे. या दोन्ही राजेंच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, नेटकऱ्यांकडून याचे भरभरून कौतुक होत आहे.
झुकेगा नहीं साला; उदयनराजेंनी ‘पुष्पा’ स्टाईलमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या दाढीचं केलं कौतुक pic.twitter.com/UMeqn9qSvC
— Lokmat (@lokmat) November 15, 2025