नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:30 IST2022-07-23T16:29:19+5:302022-07-23T16:30:44+5:30
मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला.

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उदयनराजेंनी घेतली भेट, राष्ट्रपतींनी दिलं 'हे' आश्वासन
सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन महिलांचा सन्मान करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या ऐतिहासिक सातारानगरीला मी आवश्य भेट देईन,’ असे आश्वासन नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले. द्रौपदी मुर्मूजी यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन त्यांचे गौरव केले. यावेळी त्या बोलत होत्या.
खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतिपदी प्रथमच आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला.
या भेटीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे एक प्रतिक राजमुद्रा आणि पुष्पगुच्छ भेट देवून राष्ट्रपतींचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साताऱ्याचा ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा सांगितला. छत्रपती शाहू महाराजांनी वसविलेल्या सातारानगरीत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले सर्वस्वपणाला लावले होते. त्यांनी रयतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. महिलांच्या शिक्षणाची सोय साताऱ्यात निर्माण केली. अशा या ऐतिहासिक सातारानगरीला आवश्य भेट द्यावी अशी विनंती करून राष्ट्रपतीनां निमत्रित केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही काळ ज्ञानदान केले आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व चांगलेच माहीत आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे महत्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे ज्या सातारच्या छत्रपती घराण्याने महिलांच्या शिक्षणाचा वारसा निर्माण केला अशा मराठा साम्राजाच्या राजधानीस मी आवश्य भेट देईन. तसेच सातारानगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.