नाराजांशी उदयनराजेंचे संधान ! शह देण्याची रणनिती : लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:37 PM2018-09-13T23:37:09+5:302018-09-13T23:37:57+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाभर भिरकीट सुरू केली आहे. राष्ट्रवादीतल्या नाराज मंडळींची मोट बांधून जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ

 Udayanagaraj angry with the conspiracy! Strategy to Enhance: Before Lok Sabha and Vidhan Sabha elections, | नाराजांशी उदयनराजेंचे संधान ! शह देण्याची रणनिती : लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी गाठीभेटींवर भर

नाराजांशी उदयनराजेंचे संधान ! शह देण्याची रणनिती : लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी गाठीभेटींवर भर

Next

सागर गुजर ।
सातारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाभर भिरकीट सुरू केली आहे. राष्ट्रवादीतल्या नाराज मंडळींची मोट बांधून जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ नेतेमंडळींना शह देण्याची त्यांनी रणनिती आखल्याचे स्पष्टपणे पाहावयास मिळत आहे.

राष्ट्रवादीतून दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले तिसºयांदा इच्छुक आहेत. उदयनराजेंची निवडणूक लढण्याची इच्छा असली तरी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींचा त्यांना विरोध आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीरपणे उदयनराजे भोसले यांना विरोध केला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या उदयनराजेंच्या शाही सोहळ्याकडे राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी सोयीस्करपणे पाठ फिरवली होती. सध्या संधी शोधून उदयनराजे भोसले आपल्याच पक्षाच्या नेतेमंडळींवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

रामराजे नाईक-निंबाळकर व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी तर त्यांचा छत्तीसचा आकडा आहे. आता यात नव्याने भर पडली आहे ती राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांची. कोरेगावात शिंदेंना विरोध करणाºया स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन एकसळ येथे खा. उदयनराजेंनी जोरदार टीकास्त्र सोडले. विरोधकांनी एकत्र यावे. टेंडरशाही खपवून घेणार नाही, असे म्हणत त्यांनी आ. शिंदेंनाच लक्ष्य केले. उदयनराजे राष्ट्रवादीतील प्रमुख नेतेमंडळींना इशारे देऊन दबावतंत्राचा वापर करत आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे.

कोरेगाव तालुक्यात स्थायिक झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांना ‘डिस्टर्ब’ करण्यामागे उदयनराजेंनी आणखी एक राजकीय खेळी केली आहे. कोरेगावातील राष्ट्रवादीअंतर्गत स्वाभिमानी राष्ट्रवादी विकास मंचच्या स्थापनेला उदयनराजेंचीच फूस असल्याची चर्चा आहे. एकसळला उदयनराजेंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सुनील खत्री, विठ्ठलराव कदम, अजय कदम, नाना भिलारे ही खा. शरद पवार व आ. अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरेगावातली नाराजांची फौज उदयनराजेंच्या आश्रयाला जाऊन वेगळेच काही घडू शकते, असेही बोलले जात आहे. जिल्ह्यातील वाई-खंडाळा-महाबळेश्वर, फलटण, सातारा-जावळी, कोरेगाव, कºहाड उत्तर हे पाच विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. मात्र, प्रत्येक तालुक्यात नाराज मंडळींचा गटही तितक्याच ताकदीने कार्यरत आहेत.

सातारा-जावळी, फलटण मतदारसंघांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांविरोधात मोहिमा काढल्या होत्या. आता वाई, पाटण, कºहाड उत्तर या मतदारसंघांतही ते शिरकाव करून स्थानिक आमदारांना ‘डिस्टर्ब’ करण्याची शक्यता आहे. आमदारांवर नाराज असणारी पक्षातील स्थानिक नेतेमंडळी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या पक्षांतील उदयनराजेंना मानणारी मंडळी ‘राष्ट्रवादीच्या आमदारांना विरोध’ या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात, त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा ठरणारी आहे.

कोणाला नाही घाबरत : शिवेंद्रसिंहराजे
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ‘आपण कोणाला घाबरत नाही, आजपर्यंत केवळ आदरामुळे आपण मागच्या पावलावर होतो; पण भाऊसाहेब महाराजांची पार्टी व विचार या तालुक्यातून संपविण्याची भाषा किंवा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम भाऊसाहेब महाराजांचे कार्यकर्ते नक्की करून दाखवतील,’ अशा शब्दांत नाव न घेता उदयनराजेंना डिवचले आहे.

Web Title:  Udayanagaraj angry with the conspiracy! Strategy to Enhance: Before Lok Sabha and Vidhan Sabha elections,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.