साताऱ्यात दुचाकी चोरणारी टोळी अटकेत, सात मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:40 IST2019-02-23T16:38:24+5:302019-02-23T16:40:42+5:30
सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण वसंत चव्हाण (वय २०,रा. गोपाळवस्ती झोपडपट्टी, सातारा) याच्यासह एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

साताऱ्यात दुचाकी चोरणारी टोळी अटकेत, सात मोटारसायकली जप्त
सातारा: शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण वसंत चव्हाण (वय २०,रा. गोपाळवस्ती झोपडपट्टी, सातारा) याच्यासह एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात आणि परिसरात दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पथके तैनात केली. त्यातील एक पथक अजंठा चौकात शुक्रवारी सायंकाळी वाहनांची तपासणी करत होते.
यावेळी कऱ्हाड बाजूकडून किरण चव्हाण हा दुचाकीवरून आला. त्याला पोलिसांनी अडवले. गाडीची कागदपत्रे आणि वाहन चालविण्याचा परवाना मागितला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना त्याची शंका आली. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे पुढे आले.
त्याला पोलीसीखाक्या दाखविताच त्याने त्याच्या दुसऱ्या साथीदाराचेही नाव पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला विलासपूर गोडोली येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. अशा प्रकारे एकूण सात दुचाकी दोघांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १ लाख ४७ हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांकडे पोलीस कसून चौकशी करत असून, या दोघांचे आणखी कोण साथीदार आहे का, याचीही माहिती घेत आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक एस.सी. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, पोलीस नाईक मुनिर मुल्ला, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, सुनिल भोसले, अनिल स्वामी, निलेश गायकवाड, संतोष भिसे, धीरज कुंभार, शिवाजी भिसे, डुबल, सचिन माने यांनी केली.