दोन मिनिटांचे अंतर.. २५ किलोमीटरचा प्रवास
By Admin | Updated: September 26, 2016 00:08 IST2016-09-26T00:03:27+5:302016-09-26T00:08:09+5:30
वडूथ-आरळे पूल : ग्रामस्थांना करावी लागते पायपीट; वेळेसह आर्थिक नुकसान; वाहनधारकांना प्रतीक्षा काम पूर्ण होण्याची

दोन मिनिटांचे अंतर.. २५ किलोमीटरचा प्रवास
शिवथर : वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने वडूथ गावाचा आरळे गावाबरोबर संपर्क तुटला आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. अगदी आरळे आणि वडूथ गावाच्या मध्यातून कृष्णानदी वाहत आहे. चारचाकी घेऊन जायचं म्हटलं तर अवघ्या दोनच मिनिटांमध्ये जाता येत होतं; परंतु कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गावात अत्यावश्यक असेल तर कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय.
यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ पुलाकडे टक लावून बसले आहेत. पुलाचे काम चालू कधी होणार आणि संपणार कधी, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
वडूथ- आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलावरून शाळेसाठी मुलं बसाप्पाचीवाडी, पाटखळ माथा, वाढे येथून येत असतात; परंतु या मुलांना वडूथच्या अलीकडे एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या पुलावरून वाहन जात नसल्याने मोठी चालण्याची कसरत करावी लागत आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. नदीच्या अलीकडून पलीकडे फक्त बघायची भूमिका चारचाकी वाहनचालक करत आहेत. जायचं म्हटलं तर पंचवीस किलोमीटरचे अंतर म्हणजे सातारापर्यंत येथून माहुली, सोनगाव, बोखरळ, वडूथ असा प्रवास चारचाकी वाहनाकरिता करावा लागत आहे.
साताऱ्याकडे जाण्यासाठी फलटणवरून येणाऱ्या वाहनांची फसगत होत आहे. वडूथ येथे गाडी आल्यावर वाहनचालकांना अवघा वडूथपासून सातारा आठ किलोमीटर आहे. परंतु त्यासाठी देखील पंचवीस किलोमीटरचे अंतर तोडावे लागत आहे. आठ दिवसांमध्येच वाहनचालक व ग्रामस्थ या पडलेल्या पुलाला वैतागले आहेत.
कृष्णानदीवर पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून बोललं जातंय की, आम्ही काही दिवस त्रास सहन करू; परंतु कामच चालू नाही तर संपणार कधी, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
काम चांगल्या प्रकारे व्हावे
पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलाचे काम सुरू आहे. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे. पुलाचं काम चांगल्या स्वरुपाचं व्हावं आता आम्ही त्रास सहन करत आहे. परंतु या पुलाचं काम त्वरित मार्गी लागावं, अशी आमची भूमिका आहे.
- राहुल कदम, वडाप व्यावसायिक, आरळे