पुलाच्या सळ्या शरीरात घुसल्याने दोघे ठार, तुळसणला भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:30 IST2021-04-19T18:21:24+5:302021-04-19T18:30:50+5:30
: बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकी खाली कोसळल्याने बांधकामासाठी उभारलेल्या सळ्या अंगात घुसून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. कऱ्हाड-चांदोली मार्गावर तुळसण, ता. कऱ्हाड येथील पुलावर रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.

पुलाच्या सळ्या शरीरात घुसल्याने दोघे ठार, तुळसणला भीषण अपघात
कऱ्हाड : बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून दुचाकी खाली कोसळल्याने बांधकामासाठी उभारलेल्या सळ्या अंगात घुसून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. कऱ्हाड-चांदोली मार्गावर तुळसण, ता. कऱ्हाड येथील पुलावर रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.
जानु भैरु झोरे व कोंडीबा भागोजी पाटणे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर दगडू बिरू झोरे (तिघेही रा. भेंडवडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड ते चांदोली मार्गावर ओंड-उंडाळे यादरम्यान असलेल्या तुळसण पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला असून, पुलाच्या एका बाजूने वाहतुकीसाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या कच्च्या रस्त्यावरूनच सध्या वाहनांची वर्दळ सुरू आहे.
रविवारी रात्री जानू झोरे, कोंडीबा पाटणे व दगडू झोरे हे तिघेजण दुचाकीवरून निघाले होते. कच्च्या रस्त्यावरून जाण्याऐवजी ते थेट पुलावर गेले. रात्रीच्या वेळेस पुलावरील अडथळे निदर्शनास न आल्यामुळे भरधाव दुचाकी बॅरिगेट्स तोडून पुलावरून खाली कोसळली. त्यामध्ये दोघे ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचे मृतदेह पुलाच्या बांधकामातील सळ्यांमध्ये अडकले होते. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने ते मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार खराडे तपास करीत आहेत.