Two killed in accidents in Satara district | सातारा जिल्ह्यात अपघातांत दोन ठार
सातारा जिल्ह्यात अपघातांत दोन ठार

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात दोन अपघातात दोनजण ठार अ‍ॅपेरिक्षा उलटल्याने सात प्रवासी जखमी

सातारा : जिल्ह्यात विविध दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. संजय वामन जाधव (वय ४८, रा. भरतगाव, ता. सातारा), माखवान (वय ४८) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय जाधव हे साताऱ्याहून दुचाकीवरून रात्री साठेआठच्या सुमारास भरतगावला निघाले होते.

यावेळी शेंद्रे गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.


दरम्यान, दुसरा अपघात खंडाळा गावच्या हद्दीत झाला. पारगावच्या कमानीजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने माखवान यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माखवान यांचे पूर्ण नाव आणि पत्ता पोलिसांना समजला नसून, पोलिसांकडून त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


अ‍ॅपेरिक्षा लटी झाल्याने सात प्रवासी जखमी

पेरलेहून कुसवडेकडे जात असताना माजगाव फाटा, ता. सातारा येथे अ‍ॅपेरिक्षा उलटी होऊन झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

विनोद नामदेव जाधव (वय ३८, रिक्षा चालक), शकुंतला नामदेव जाधव (वय ७०), श्रावणी विनोद जाधव (वय १२), अर्चना विनोद जाधव (वय ३५, सर्व रा. पेरले, ता. कऱ्हाड ), नंदा लक्ष्मण पवार (वय ४५), लक्ष्मीबाई सदाशीव पवार (वय ७५, रा. कुसवडे, ता. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हे सर्वजण अ‍ॅपेरिक्षाने कुसवडे, ता. सातारा येथे निघाले होते.

माजगाव फाट्यावर आल्यानंतर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे अ‍ॅपेरिक्षा उलटी झाली. अपघात झाल्यानंतर रिक्षातील प्रवाशांना काही नागरिकांनी तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. हात पाय, डोके, पाठ आदी ठिकाणी प्रवाशांना जखमा झाल्या आहेत.

 


Web Title: Two killed in accidents in Satara district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.