Satara: कुंपणातील वीजप्रवाहाचा धक्का लागून दोन गव्यांचा मृत्यू; दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:54 IST2024-02-05T11:45:33+5:302024-02-05T11:54:25+5:30
सणबूर : पीक संरक्षणासाठी वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श करणाऱ्या दोन गव्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ...

Satara: कुंपणातील वीजप्रवाहाचा धक्का लागून दोन गव्यांचा मृत्यू; दोघांवर गुन्हा
सणबूर : पीक संरक्षणासाठी वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श करणाऱ्या दोन गव्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री पाटण तालुक्यातील महिंद धरणक्षेत्रात सळवे गावानजीकच्या बोर्गेवाडी येथे घडली. या प्रकरणी दोघांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.
महिंद धरणालगत असलेल्या गावांमधील शेतकरी वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवीत आहेत. त्यातच शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यामध्ये वीजप्रवाह सोडण्याचा प्रकारही काही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. बोर्गेवाडीत याच प्रकारामुळे दोन गव्यांचा बळी गेला. शनिवारी रात्री बोर्गेवाडी येथील शिवारात आलेल्या दोन गव्यांचा वीजप्रवाह सोडलेल्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन्ही गव्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी शेतात दोन गवे मृतावस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषीकेश व्हनाळे यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही मृत गव्यांचे शवविच्छेदन केले. त्यानंतर त्याच ठिकाणी गव्यांचे दहन करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी सत्यवान ज्ञानदेव कदम व लक्ष्मण तुकाराम बोरगे (रा. बोर्गेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे यांच्यासमोर अधिक चौकशीसाठी नेण्यात येणार आहे. उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनरक्षक महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, वनपाल डी. डी. बोडके, अमृत पन्हाळे तपास करीत आहेत.
वनविभागाकडून अनुदानावर झटका मशिन
वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी वनविभागातर्फे सौरऊर्जेवरच्या झटका मशिन खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान देण्यात येते. हे झटका मशिन शेतीच्या बाजूने कम्पाऊंड करून त्याला तारेने करंट दिला जातो. आतापर्यंत याचे ३५० प्रस्ताव वनविभागाकडे आले आहेत. त्यांमधील ७५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. हे झटका मशिन शेतामध्ये वन्यप्राणी आल्यावर त्याला सौम्य प्रकारचा झटका बसतो; त्यामुळे ते जनावरे त्या ठिकाणी येत नाहीत.