रशिद शेख औंध : औंध येथील रामदास अशोक दंडवते या २८ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी औंध पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली. रोहन मल्हारी मदने, गुरूराज दत्तात्रय मदने (दोघे रा.खरशिंगे ता. खटाव) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी अवघ्या बारा तासात मृतदेहाची ओळख पटवत आरोपींना जेरबंद केले.याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी (दि.२१) दुपारी आरोपी रोहन व गुरूराज मदने व मृत रामदास दंडवते हे सुतार खडवी परिसरात मद्यपान करत बसले होते. या दरम्यान आपापसात वादावादी झाली. शेवटी याचे पर्यावसन मारामारीत झाले. यात रामदास दंडवते याच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतदेह सापडू नये म्हणून आरोपींनी सुतार खडवी जवळच्या झाडीत लपवून ठेवला होता. दरम्यान याबाबत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सपोनि अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपूज, औंध, खरशिंगे परिसरात कसून शोध घेतल्यानंतर रामदास दंडवते याचा मृतदेह गोपूज नजीक सापडला. त्यानंतर संशयित आरोपी रोहन मदने यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व यामध्ये आपल्यासह चुलत चुलते गुरूराज मदने सहभागी असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पथक पाठवून लोणंद येथून आज, मंगळवारी पहाटे गुरूराज मदने यास ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद लिला अशोक दंडवते यांनी दिली आहे. या घटनेमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास सपोनि अविनाश मते हे करीत आहेत.