वीस वर्षे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; प्रशासन दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 07:17 PM2019-12-21T19:17:05+5:302019-12-21T19:22:34+5:30

बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 साली करण्यात आले होते.

Twenty years' worth of farmers; | वीस वर्षे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; प्रशासन दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहन

वीस वर्षे शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; प्रशासन दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहन

googlenewsNext
ठळक मुद्देमहामार्गाला दिली होती जागा, प्रशासन अजून दखल घेईना म्हणून ते करणार आता आत्मदहनप्रशासनाला जागच येत नसेल तर हे निष्क्रिय प्रशासन काय कामाचे?

वेळे (सातारा) - हायवेमध्ये गेलेल्या जमिनीचा 20 वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत नुकसान भरपाई चा मोबदला न मिळाल्याने वेळे, ता. वाई येथील शेतकरी बाळकृष्ण रामचंद्र पवार यांनी हायवेवरच आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सातारा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांना यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

महामार्ग चौपदरी करणाच्या वेळी बाळकृष्ण पवार यांच्या मालकीची तीन गटांतील एकूण 10 गुंठे जमीन महामार्ग बनवण्यासाठी संपादित करण्यात आली. तशा नोंदीही सातबारा उताऱ्यावर फेरफार नुसार करण्यात आल्या. त्या नोंदींप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांच्या जमिनीतून महामार्ग बनविला. हे काम सन 2000 साली करण्यात आले होते.

या जमिनीचा मोबदला देण्याचे प्राधिकरणाने कबूल केले होते. मात्र आजमितीला जवळपास 20 वर्षे पूर्ण होत आली तरीही या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी या शेतकऱ्याला झगडावे लागत आहे. एवढे झगडून देखील पदरी निराशाच आल्याने खचून जावून त्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

एकूण 10 गुंठे जमिनी पैकी फक्त 1 गुंठे क्षेत्राची मोबदला रक्कम प्राधिकरणाने या शेतकऱ्याला अदा केली. उर्वरीत 9 गुंठे क्षेत्राची रक्कम अजूनही मिळाली नसल्याची स्पष्टोक्ती बाळकृष्ण पवार यांनी दिली. ही मोबदला रक्कम मिळविण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रे तयार करून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व संबंधित विभाग आणि कार्यालये यांना वेळोवेळी संपर्क साधून, पत्रव्यवहार करून, अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेवून देखील त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखवत सोयीस्कर रित्या टाळाटाळ केली जात असल्याने आता दाद तरी कोणाला मागायची? हा प्रश्न त्यांना सतावू लागल्याने अखेर त्यांनी आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या इशारा वजा निवेदनात असे म्हटले आहे की, सदर जमिनीचा मोबदला या महिनाअखेर मिळाला नाही तर त्यानंतर कोणत्याही क्षणी या जमिनीतून गेलेला महामार्ग बंद करून प्रसंगी त्याच ठिकाणी सहकुटुंब आत्मदहन करण्यात येईल. या होणाऱ्या प्रसंगाला महामार्ग प्राधिकरण व संपूर्ण प्रशासनच जबाबदार असणार आहे. तसेच  मोबदला न मिळालेल्या जमिनीतून अवैधपणे नेलेला राष्ट्रीय महामार्ग मी बंद का करू नये? असा सडेतोड प्रश्नही त्यांनी या निवेदनातून विचारला आहे.

बाळकृष्ण पवार यांचेसह स्वप्नील बाळासाहेब कांगडे, विजय लक्ष्मण कांगडे, धर्मु बाजीराव पवार, संतोष रघुनाथ पवार या शेतकऱ्यांना देखील मोबदला रक्कम मिळविण्यासाठी सरकार दफ्तरी उंबरठे झिझवावे लागत आहेत. तरी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा एवढीच माफक अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय हितासाठी आपल्या मालकी हक्काच्या जमिनी देवून देखील त्याच्या नुकसान भरपाईसाठी वीस वर्षे लागत असतील तर यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव ते काय! त्यामुळेच शेतकरी संतापला जातो व टोकाचे पाऊल उचलतो. तरीही प्रशासनाला जागच येत नसेल तर हे निष्क्रिय प्रशासन काय कामाचे?


Quote: मी गेली वीस वर्षांपासून माझ्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून अनेकदा संबंधित कार्यालयांत हेलपाटे मारत होतो. मात्र माझी जमीनच संपादित केली नाही तर मोबदला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर मिळाले. वास्तविक जमीन संपादित झाली असल्याचे पुरावे सादर करूनही मला वेठीस धरले जात आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या जमिनीतून गेलेला महामार्ग बंद करून प्रसंगी आत्मदहन करण्याच्या विचारात आहे.
_ बाळकृष्ण पवार, बाधित शेतकरी, वेळे

Web Title: Twenty years' worth of farmers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.