बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून ; मित्रानानेच बदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:38 IST2021-01-07T15:35:37+5:302021-01-07T15:38:58+5:30
Murder Sataranews-म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. मन सून्न करणाऱ्या या घटनेने अनेकांची मने हेलावून गेली.

बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खून ; मित्रानानेच बदला
सातारा : म्हसवे, (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा त्याच्या अल्पवयीन मित्रानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नऊच्या सुमारास म्हसवे येथे उघडकीस आली. मन सून्न करणाऱ्या या घटनेने अनेकांची मने हेलावून गेली.
गंगाराम रमेश राठोड (वय १२, रा. म्हसवे, ता. सातारा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगाराम हा मंगळवार, दि. ५ रोजी सायंकाळी घरासमोरून अचानक बेपत्ता झाला. मुलगा बराचवेळ घरी न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यामुळे आई ललिता राठोड यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी म्हसवडे येथील एका ऊसाच्या शेताजवळ गंगारामचा पायमोजा पडला असल्याचे त्याच्या घरातल्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ श्वानाला पाचारण केले. श्वान घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याला गंगारामच्या पायमोजाचा वास देण्यात आला. श्वान धावतच उसाच्या शेतातून पलीकडच्या शेतात गेले. त्या ठिकाणी गंगारामचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.
मृतदेहाशेजारी सात ते आठ दगड पडले होते. गंगारामचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मात्र, हा खून नेमका कोणी केला, याचा पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याच्यासोबत कायम असणाऱ्या त्याच्या १६ वर्षाच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यावेळी तो घाबरल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. काही दिवसांपर्वूी गंगाराम आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला होता. त्यावेळी गंगारामने त्याला शिवीगाळ केली. याचा बदला म्हणून त्याने गंगारामचा खून केला.
घटनास्थळाचे चित्र विदारक...
गंगाराम राठोडचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. डोके, तोंड आणि छातीवर दगड मारण्यात आले आहेत. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने म्हसवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.