भाषा-संस्कृती जपण्याचे प्रयत्न व्हावेत
By Admin | Updated: October 12, 2015 00:36 IST2015-10-11T23:21:25+5:302015-10-12T00:36:15+5:30
एल. हनुमंतप्पा : जत येथे कन्नड-मराठी भावैक्य संमेलनास प्रतिसाद

भाषा-संस्कृती जपण्याचे प्रयत्न व्हावेत
जत : मुंबईप्रमाणे देशातील इतर मोठ्या महानगरांत देशाच्या विविध भागातून व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक लोक येऊन वास्तव्य करीत आहेत. त्यांची भाषा व संस्कृती वेगळी आहे. ती जपण्यासाठी तेथील शासनाने पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत कर्नाटक राज्याचे कन्नड अभिवृद्धी प्राधिकार समितीचे अध्यक्ष डॉ. एल. हनुमंतप्पा यांनी व्यक्त केले. या समितीच्यावतीने जत येथे कन्नड-मराठी भाषा भावैक्य संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेवर आधारित प्रांतरचना झाली असली तरी, सध्या एकाच राज्यात चार-पाच भाषा बोलणारे व संस्कृती जपणारे लोक राहत आहेत. कोणती भाषा बोलावी, हे ज्यांनी त्यांनी ठरविणे आवश्यक आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, गडीनाडू भागातील कन्नड व मराठी बांधवांनी एकत्र सेतूप्रमाणे काम करावे व आपापली भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. भाषा हे संवादाचे सर्वात उत्तम साधन आहे. धर्मावर प्रेम करण्यापेक्षा माणसावर प्रेम करा, त्यामुळे आपापसात दरी निर्माण होणार नाही. परस्परांमध्ये स्नेहाचे वातावरण निर्माण होण्यासाठी यापुढील काळात असेच एकत्रित कार्यक्रम आयोजित करून कन्नड व मराठी बांधवांत बंधुभाव निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सीमाप्रश्नाचे कोणतेही पडसाद आजपर्यंत जत शहरात उमटलेले नाहीत. कन्नड व मराठी भाषिक लोक आम्ही येथे आनंदाने राहत असल्याची भावना आ. विलासराव जगताप यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी माजी आमदार उमाजी सनमडीकर, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, अॅड. प्रभाकर जाधव, डॉ. रवींद्र आरळी, सी. आर. गोब्बी, सुरेश शिंदे, जतचे नगराध्यक्ष इकबाल गवंडी, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी, मकरंद देशपांडे, विष्णू नाईक, वैजनाथ महाजन, चंद्रशेखर ताळ्या, शरद जाधव यांच्यासह मान्यवर, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. राजेंद्र माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
अभिमान बाळगा : पण संघर्ष नको
प्रत्येकाला स्वत:च्या भाषेचा अभिमान असावा, परंतु दुसऱ्याच्या भाषेचा दुजाभाव करू नये. सीमाभागातील जनता आजवर गुण्यागोविंदाने राहत आली आहे. भाषा ही संवादाचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येकाने आपल्या भाषेची अभिवृद्धी करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने सर्वच भाषांचा समन्वय साधून स्वत:चा शैक्षणिक विकास करून घ्यावा. कारण नसताना संघर्ष करू नये, अशी भावना यावेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमस्थळी मराठी फलक नसल्याने नाराजी
महाराष्ट्रात राहून कन्नड माध्यमातून शिक्षण घेऊन त्यामध्ये विशेष यश संपादन केलेल्या ३२५ विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भाव
\ैक्य संमेलन म्हणून मराठी व कन्नड भाषिक साहित्यामध्ये संवादाचा सेतू समजल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली असली तरी, येथे एकही फलक मराठीत नव्हता. त्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.