डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:40+5:302021-02-05T09:19:40+5:30
सातारा : मागील काही दिवसांपासून डिझेलचा दर वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणाऱ्या मशागतीचा दरही वाढत आहे. एकरामागे सरासरी ...

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागत महागली
सातारा : मागील काही दिवसांपासून डिझेलचा दर वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणाऱ्या मशागतीचा दरही वाढत आहे. एकरामागे सरासरी दीड हजार रुपयांची वाढ आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सध्याची शेती ही अधिक करून यांत्रिकीकरणावर अवलंबून आहे, तर मशागत, पेरणी करायची झाली, तर ट्रॅक्टर किंवा यंत्राशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, सद्य:स्थितीत शेतकऱ्यांना ट्रॅक्रटद्वारे शेतीची कामे करणे तोट्याचे होऊ लागले आहे. कारण, डिझेलचा भाव वाढून ८२ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे मशागतीचा खर्चही वाढत चालला आहे.
नांगरणी, फणपाळी, पेरणी यांचा खर्च विचारात घेता तो चार ते पाच हजारांपर्यंत जात आहे. त्यातून निसर्गाची साथ आणि उत्पादन किती मिळणार, याची काहीच श्वाश्वती नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तर ट्रॅक्टरपेक्षा बैलांचाही विचार सुरू केला आहे. कारण, इंधनाचे दर सतत वाढणार आहेत. त्यामुळे खर्च आणखीच वाढत जाणार आहे.
चौकट :
मशागतीचा खर्च एकरी पाच हजारांपर्यंत
१. ट्रॅक्टरद्वारे जमिनीची मशागत करणे म्हणजे आर्थिक फटका सहन करणे, अशी विचारधारा शेतकऱ्यांत रुजू लागली आहे. कारण, डिझेलचा दर वाढल्याने आपोआप खर्चात वाढ झालेली आहे.
२. पूर्वी एकरी अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंतच खर्च येत होता; पण डिझेलचा दर वाढल्याने तो चार ते पाच हजार रुपयांपर्यंत गेला आहे.
३. विशेषकरून नांगरणीमागे खर्च अधिक वाढला आहे. कारण डिझेल जादा लागते. त्यामुळे एकरी ७०० ते ९०० रुपये वाढ आहे.
..................................
मशागतीचे दर (प्रतिएकर)
नांगरणी १,८००
२,६००
रोटा १,७००
२,५००
फणपाळी ८००
१,०००
नांगरणी रोटा १,८००
२,६००
पेरणी १,०००
१,२००
चार फुटी सरी १,२००
१,८००
................................
कोट :
दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच आता डिझेलचा दरही वाढत असल्याने ट्रॅक्टरद्वारे मशागतीचा दरही वाढला आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
-प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी
..........................
शेती केली तर फायद्याची आहे; पण निसर्गाची साथही महत्त्वाची ठरते. त्यातच आता डिझेलचा दर वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, फणपाळी, पेरणी करायची झाली, तर एकरी किमान दीड ते दोन हजार जादा लागणार आहेत.
-जगन्नाथ यादव, शेतकरी
........................
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी डिझेलचा दर कमी होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दर वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, एकरी किमान दीड हजार रुपये मशागतीसाठी अधिक लागणार आहेत.
-संजय कदम, ट्रॅक्टरमालक
........................................................