Satara tourism: कास पर्यटन भारी.. वाहनतळापासून पुष्प पठारापर्यंत प्रवासासाठी खासगीऐवजी हवी लालपरी !

By जगदीश कोष्टी | Updated: July 7, 2025 15:53 IST2025-07-07T15:51:09+5:302025-07-07T15:53:07+5:30

प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे

Tourists on Kaas plateau should use ST buses instead of private buses to travel from the parking lot to Pushpa plateau | Satara tourism: कास पर्यटन भारी.. वाहनतळापासून पुष्प पठारापर्यंत प्रवासासाठी खासगीऐवजी हवी लालपरी !

Satara tourism: कास पर्यटन भारी.. वाहनतळापासून पुष्प पठारापर्यंत प्रवासासाठी खासगीऐवजी हवी लालपरी !

जगदीश कोष्टी

सातारा : कास येथील पुष्प पठार हे पर्यावरणप्रेमींसाठी पंढरीच असते. ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत पुष्प पठाराला जवळपास लाख-दीड लाख पर्यटक भेट देतात. पर्यावरण रक्षण आणि पठारावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पठाराच्या अलीकडेच वाहनतळ केलेले असते. वाहनतळावर गाड्या लावून समितीच्या गाडीतून जाणे अपेक्षित आहे. पण त्या गाड्या खासगी आहेत. त्याऐवजी एसटीच्या ई-शिवाई गाड्यांचा पर्याय म्हणून विचार व्हायला हवा.

सातारा जिल्ह्याला निसर्गाने दहा हातांनी वरदान भरभरून दिले आहे. महाबळेश्वरमधील असंख्य पॉईंट, सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या दऱ्या, पाचगणीमधील टेबल लॅण्ड नेहमीच देश भुरळ घातल असते. या भागात असंख्य पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. कास पुष्प पठार हा येथे लाभलेला एक नैसर्गिक चमत्कारच मानला पाहिजे. कारण पठारावर फुलत असलेली फुले अन्यत्र कोठेच उगवत नाहीत. तसेच ठराविक कालावधीनंतर विविध रंगातील, आकारातील, प्रकारातील फुलांचा बहर पाहावयास मिळत असतो. 

निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. यातील ९० टक्के पर्यटक खासगी वाहनांनी येतात. यामुळे प्रदूषण होते. तसेच वाहतूक कोंडीही होत असते. हे टाळण्यासाठी कास समितीकडून खास वाहनांची सोय केली आहे. वाहनतळापासून त्या पठारापर्यंत सोडत असतात.

दरवेळी भाड्याची गाडी

प्रत्येक हंगामात कास कार्यकारी समिती खासगी वाहतूकदार कंपनीकडून भाडेतत्त्वावर गाड्या घेत असते. त्या गाड्या वाहन तळापासून कासपर्यंत पर्यटकांना पोहोचवणे आणि पुन्हा घेऊन येण्याचे काम करते. पण यामध्ये खासगी कंपनी मोठी होत असते. २०२३ च्या हंगामात कास कार्यकारी समितीने पुण्यातील ई-बसचा वापर केला. पण त्यांचे भाडे परवडणारे नाही.

यापूर्वी एसटीच्या मिनी बस

कास पुष्प पठाराला आठ ते दहा वर्षांपूर्वी युनोस्कोच्या पथकाने भेट दिली होती. तेव्हा पठारापर्यंत येत असलेल्या गाड्या पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली होती. गाड्यांच्या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहनतळ दुसरीकडे ठेवून धूरविरहित गाड्यांतून पर्यटकांना आणण्याचा सल्ला देण्यात आला. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी, एसटीचे अधिकारी अन् कास समितीची बैठक झाली. त्या हंगामात एसटीच्या मिनी बसचा वापर करण्यात आला होता.

प्रदूषणमुक्त गाड्या

एसटी ताब्यात सध्या ई-शिवाई तसेच नवीन लालपरी गाड्या आल्या आहेत. या गाड्यांमधून धूरही फार येत नाही. त्यामुळे या गाड्या पर्यावरण पूरक आहेत. त्याचवेळी एसटी तोट्यात आहे म्हणून एकीकडे ओरड करायची आणि दुसरीकडे दररोज हजारो पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करायचा. हे योग्य वाटत नाही. त्यामुळे एसटीचा वापर करावा, अशी मागणी केली जात आहे.

शेवटचा पर्यटकही न्यावा

कास पठारावरील सेवा दररोज सायंकाळी सहानंतर बंद होते. पण काहीजण पर्यटक, एखादे कुटुंब चुकून उशिरा आले तर ते पठारावरच राहू नये. शेवटच्या पर्यटकाला घेऊन जाण्यासाठी एसटी थांबायला हवी. - ज्ञानेश्वर आखाडे, सदस्य, कास कार्यकारी समिती 

Web Title: Tourists on Kaas plateau should use ST buses instead of private buses to travel from the parking lot to Pushpa plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.