सडावाघापूरच्या उलटा धबधबा परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:43+5:302021-06-22T04:25:43+5:30

चाफळ : ‘निसर्गाची मुक्त उधळण केलेल्या चाफळ विभागातील सडावाघापूरजवळील उलटा धबधबा परिसरात पडत असलेल्या पावसामुळे निसर्गसौंदर्यात भर पडत असताना ...

Tourist riots in the reverse waterfall area of Sadavaghapur | सडावाघापूरच्या उलटा धबधबा परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी

सडावाघापूरच्या उलटा धबधबा परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी

चाफळ : ‘निसर्गाची मुक्त उधळण केलेल्या चाफळ विभागातील सडावाघापूरजवळील उलटा धबधबा परिसरात पडत असलेल्या पावसामुळे निसर्गसौंदर्यात भर पडत असताना या ठिकाणाला हुल्लडबाज तरुणांचे ग्रहण लागले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या परिसरात मास्क न वापरता धिंगाणा घालत हुल्लडबाजी करणाऱ्या १५९ जणांवर पोलिसांनी कारवाई करत ६७,२०० रुपयांचा दंड वसूल केला.

चाफळ विभागाच्या उंच डोंगरमाथ्यावर सडावाघापूर गाव वसलेले आहे. या गावाजवळ निसर्गाने मुक्त उधळण केलेला उलटा धबधबा हे ठिकाण आहे. एका डोंगराच्या कड्यातून पडणारे पावसाचे पाणी परत उलट्या दिशेने येत असते. दाट धुके, रिमझिम पडत असलेला पाऊस यातच पठारावरील आल्हादायक वातावरण हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर येथून दररोज हजारो पर्यटक येथे तुफान गर्दी करत असतात. यात काहीजण कुटुंबासोबत तर काहीजण मित्र-मैत्रिणींसोबत या परिसराला भेट देत असतात. निसर्गरम्य थंड वातावरणाचा आनंद घेत असताना काही जण हुल्लडबाजी करत मद्यपान विनामास्क मोकाट फिरत येथे धिंगाणा घालत असतात. याचा नाहक त्रास मात्र स्थानिकांसह कुटुंबासमवेत येथे येणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत होता.

एकीकडे प्रशासन कोरोना आटोक्यात यावा तिसरी लाट थोपवता यावी यासाठी विविध उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळताच तरुणाई सैराट होत हुल्लडबाजी करत आहे. याला आळा बसावा यासाठी उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली सडावाघापूर परिसरात शनिवार व रविवारी पोलीस पथकाने १५९ हुल्लडबाजांवर कारवाई करत ६७२०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे येथे येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना चाप बसला आहे. तारळे, पाटण व चाफळमार्गे येणाऱ्या हुल्लडबाजांना प्रतिबंध बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत चाफळ पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे, मेजर प्रवीण फडतरे, संदीप पवार, अमोल खवले, नंदकुमार निकम, विशाल नलवडे, वैभव यादव आदींनी सहभाग घेतला.

फोटो चाफळ पोलीस

सडावाघापूर येथील उलटा धबधबा परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर पोलीस पथकाने कारवाई केली. (छाया : हणमंत यादव)

Web Title: Tourist riots in the reverse waterfall area of Sadavaghapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.