राज्यातील पर्यटनस्थळांचे महाबळेश्वरसारखे ब्रँडिंग करायचे; मंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:06 IST2025-04-21T18:05:36+5:302025-04-21T18:06:09+5:30
सातारा : महाबळेश्वर व पाचगणीला देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देत असतात. त्याच पद्धतीने राज्यातील इतर पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग करून जास्तीत ...

संग्रहित छाया
सातारा : महाबळेश्वर व पाचगणीला देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देत असतात. त्याच पद्धतीने राज्यातील इतर पर्यटनस्थळांचे ब्रँडिंग करून जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील याची पाहणी दौऱ्यात माहिती घेतल्याचे पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
मंत्री इंद्रनील रविवारी महाबळेश्वर दौऱ्यावर आले होते. यावेळी मधाचे संग्रहालय व विक्री केंद्रास आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास त्यांनी भेट दिली. तसेच त्यांनी महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसराची आणि प्राचीन मंदिरांची पाहणी केली. सुरुवातीला त्यांनी पाच नद्यांचा संगम असणाऱ्या पंचगंगा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली.
त्यानंतर जुन्या महाबळेश्वरमधील हेमाडपंथी वास्तुशैली असणाऱ्या व प्राचीन शिवमंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची पाहणी केली. तसेच कृष्णा नदीच्या उगमस्थानी वसलेल्या कृष्णामाई मंदिरात जाऊन देवीची पूजा केली व मंदिराची पाहणी केली. याप्रसंगी महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील, विशाल जाधव, तलाठी सागर शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.
मध उत्पादकांना प्रोत्साहन
मधाचे संग्रहालय व विक्री केंद्र मधुसागर केंद्रासही त्यांनी भेट देऊन मधाचे उत्पादन, विक्री व संकलनाची माहिती जाणून घेतली. स्थानिक व्यवसाय व स्थानिक उत्पादनांची माहिती घेऊन व्यावसायिकांना प्रोत्साहन दिले. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन बनलेल्या वस्तूंच्या उत्पादनाची माहिती घेतली.