खाद्यासाठी रानगव्यांवर स्थलांतर करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:15 IST2018-12-30T22:15:46+5:302018-12-30T22:15:50+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा अन्नाच्या शोधार्थ वावर वाढला आहे. कोयना खोरे व महाबळेश्वरसारख्या ...

खाद्यासाठी रानगव्यांवर स्थलांतर करण्याची वेळ
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा अन्नाच्या शोधार्थ वावर वाढला आहे. कोयना खोरे व महाबळेश्वरसारख्या दुर्गम भागात आढळून येणारे रानगवे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच खंडाळा तालुक्यातील पवारवाडीच्या डोंगर परिसरात ग्रामस्थांना आढळून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
खंडाळा तालुक्यात झपाट्याने बदल होत चालला आहे. डोंगर भागात अतिक्रमण होऊ लागले आहे. त्यामुळे वन्यजीवांचे वास्तव्य धोक्यात येऊ लागले आहे. जंगल भागातील मानवी शिरकावाने प्राण्यांच्या अडचणीत वाढ झाल्याने अन्नाच्या शोधार्थ आता वन्यजीवांचे मानवी वस्तीत वावर वाढला आहे. पवारवाडी परिसरातील डोंगर पायथ्याला चारच दिवसांपूर्वी दोन रानगवे आढळून आले. रानगवे प्रामुख्याने महाबळेश्वर व कोयना खोऱ्यात दिसून येतात. मागील काही दिवसांपासून खंडाळा तालुक्याच्या दक्षिण-पश्चिम डोंगरमाथ्याला दिसून आल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
पवारवाडीतील रानगव्यांचे वास्तव्य, असवली परिसरात रानडुकरांचा होणारा त्रास, मानवी वस्तीत घुसून लांडग्यांनी फस्त केलेल्या शेळ्या, गतवर्षी मोर्वे, वाठार बुद्रुक, अंदोरी या ऊस पट्ट्याच्या परिसरात आढळलेला बिबट्या, हरळी येथील विहिरीत पडलेले भेकर, कण्हेर धरणाच्या बाहेर आढळलेली मगर, पाटणच्या खोºयात आढळलेला मोठा अजगर याशिवाय अन्य काही वन्यप्राण्यांविषयी समोर आलेल्या घटना त्यांचे जंगलातील अस्तित्व धोक्यात आल्याचे निदर्शनास आणून देत आहेत. अशा वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.