तब्बल तीन शाळा भरताहेत एकाच इमारतीत!
By Admin | Updated: October 13, 2015 00:12 IST2015-10-12T20:58:00+5:302015-10-13T00:12:32+5:30
रात्रीच बनतोय तळीरामांचा अड्डा : संरक्षक भिंतीची आवश्यकता; मैदानावर वाढलेय गवत --्रपालिकेची ‘शाळा’- दोन

तब्बल तीन शाळा भरताहेत एकाच इमारतीत!
प्रमोद सुकरे- कऱ्हाड : कऱ्हाड नगरपरिषदेतील शाळांची गणती १ ते १२ अशी होते. यातील दोन शाळा अनेक वर्षांपासून बंदच आहेत. त्याचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न कोणी केल्याचा दिसत नाही. अपवाद वगळता इतर शाळांची प्रगतीही समाधानकारक नाही. १, ७ अन् १२ क्रमांकांच्या शाळा एकाच इमारतीत भरत असून, येथील शाळेचे बाह्य अन् अंतरंग चिंताजनक आहे. कारण रात्रीच्या वेळी हा परिसर तळीरामांचा जणू अड्डाच असतो. तर सकाळी आल्यावर विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या अन् गुटख्यांच्या पुढ्यांची स्वच्छता करावी लागते.
शनिवार पेठेत सुपर मार्केटच्या समोरच्या बाजूला सुमारे सव्वाएकर जागेत भव्य इमारतीत या तिन्ही शाळा भरतात. खरंतर पालिकेच्या इतर सर्व शाळांच्या तुलनेत या शाळांना रस्त्यालगत सुमारे सव्वाएकर जागा, चांगली इमारत, प्रशस्त क्रीडांगण असा संगम पाहायला मिळतो; पण गेल्या काही वर्षांत येथे वृक्षारोपण केल्याचं अन् झाडं जगविल्याचंही ऐकिवात नाही. क्रीडांगणावर एखाद्या खेळासंदर्भात मैदान आखलेलं दिसत नाही. तर शिक्षकही विद्यार्थ्यांसह मैदानावर कधी रमलेले दिसत नाहीत.
शाळेत एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर बांधलेलं स्टेज नाही. शाळेभोवती संरक्षक भिंत नाही. आहे म्हणायला तारेचं कंपाउंड आहे; पण त्याची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच अवस्था आहे. त्यामुळे शाळा सुटल्यावर सायंकाळी या ठिकाणी तळीरामांचा वर्ग भरतो. त्यामुळे स्वच्छतेचे तर तीन-तेराच वाजलेले दिसतात. शाळा व्यवस्थापन समितीत सदस्य म्हणून मिरविणारे प्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
येथे सुमारे २० वर्ग आहेत. १० खालच्या मजल्यावर अन् १० वरच्या मजल्यावर या २० खोल्यांमध्ये ३ शाळांचे विद्यार्थी बसविले जातात. खरंतर ७ अन् १२ शाळांची गुणवत्ता यापूर्वी चांगली होती, असं म्हटलं तरी चालेल. कारण तीन वर्षांपूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांनीही एमटीएस अन् शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले होते. मात्र, गुणवत्तेचा आलेख चढता ठेवण्यात येथील शिक्षकांना यश आलेले नाही. याचं कारण काय? याचा शोध कोण घेणार? हा खरा प्रश्न आहे. यामागे शिक्षकांची उदासीनता तरी कारणीभूत नाही ना? ती कोण बदलणार? राजकारणात रमलेल्या लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष द्यायला वेळ तरी मिळणार का? हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत.
कारभारी कोण?
एक इमारत अन् शाळा तीन, त्यामुळे तीन मुख्याध्यापक आहेत. शाळा व्यवस्थापन समितीवर चार नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शाळेच्या गुणवत्तेबाबत नेमके कोणत्या मुख्याध्यापकाने पुढाकार घ्यावयाचा, असा प्रश्न त्यांच्यात पडलेला दिसतो. तर शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी कुठल्या नगरसेवकाने पुढाकार घ्यावयाचा याचा प्रश्न या लोकप्रतिनिधींच्यातही सुटलेला नाही. त्यामुळे परिसर व गुणवत्ता विकासाला संधी असतानाही गेल्या तीन वर्षांत येथे बदल झालेला दिसत नाही.
सर्वांना बसायला बेंच कुठे आहेत.
खरंतर खासगी शाळांशी स्पर्धा करत असताना पालिकेच्या शाळांनी जास्तीत सुविधा विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे बेंच. पण १ , ७ , १२ या शाळेतील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना बेंच आहेत. मात्र, पहिली ते चौथीचे विद्यार्थी फुटलेल्या फरशीवर बसूनच ज्ञानार्जनाचे धडे गिरवीत आहेत. एका खोलीत नादुरुस्त असणारे काही बेंच तसेच भरून ठेवले आहेत. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे कोणीच लक्ष देईना, असे झाले आहे.
लाखांचा निधी आहे म्हणे पडून!
नगरपालिका शाळा क्रमांक ७ ला शाळेचा विकास करण्यासाठी काही लाखांचा निधी मिळाला असल्याचे समजते; पण हा निधी गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या खात्यावर तसाच पडून असल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आहे. मग हा निधी का वापरला जात नाही, याचे उत्तर कोण देणार ?
इमारतीला गेलेत तडे...
शनिवार पेठेतील या शाळेच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. इमारतीच्या पाठीमागच्या भिंतींना मोठ्या भेगा पडलेल्या दिसतात. अस्वच्छतेच्या साम्राज्यामुळे घुशींचा वावर वाढलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला पूरक असे वातावरण या ठिकाणी असलेले दिसून येत नाही. याची काळजी नक्की घेणार तरी कोण?
खिडक्यांची दारं गायब तर पंखेही नाहीत
एकाही वर्गात पंखा बघायला सापडत नाही. विद्यार्थ्यांना उकडू नये म्हणून की काय खिडक्यांची दारे गायब आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात खिडकीमधून येणारे ऊन आणि पावसाळ्यात खिडकीतून येणारे पाणी याच्याशी सामना करत फुटलेल्या फरशींवर खिडक्यांपासून बाजूला बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मी शाळा क्रमांक ७ च्या शालेय व्यवस्थापन समितीवर आहे. त्यामुळे या शाळेतील समस्या नेहमीच मांडत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेची इमारत गळत आहे. शिक्षकांसमोर अनेक समस्या आहेत. मात्र, आम्ही विरोधी बाकावर बसत असल्याने आमच्या म्हणण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
- महादेव पवार,
विरोधी पक्षनेते,
कऱ्हाड नगरपरिषद
शाळेभोवती संरक्षक भिंत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. झाडे लावली तर ती कोण ठेवत नाहीत. देखभालीसाठी सुरक्षारक्षक नाही. विद्यार्थ्यांच्या बेंचचा प्रश्न आहे. पालिका प्रशासनाने आम्हाला भौतिक सुविधा पुरविण्यास मदत केली तर गुणवत्ता वाढीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
- एल. बी. गवळी,
मुख्याध्यापक शाळा क्रमांक ७