इतिहासप्रेमींसाठी लवकरच नवा ‘खजिना’ खुलणार!, साताऱ्यातील संग्रहालयात वस्त्र, संकीर्ण व चित्र दालन होणार खुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:41 IST2025-10-16T19:40:40+5:302025-10-16T19:41:01+5:30
सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आता लवकरच नवी तीन दालने इतिहासप्रेमींसाठी खुली होणार आहेत. यामध्ये वस्त्र, संकीर्ण ...

इतिहासप्रेमींसाठी लवकरच नवा ‘खजिना’ खुलणार!, साताऱ्यातील संग्रहालयात वस्त्र, संकीर्ण व चित्र दालन होणार खुले
सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आता लवकरच नवी तीन दालने इतिहासप्रेमींसाठी खुली होणार आहेत. यामध्ये वस्त्र, संकीर्ण व चित्र दालनाचा समावेश असून, नागरिकांना हा ऐतिहासिक ‘खजिना’ जवळून पाहता येईल.
साताऱ्यातील मार्केट यार्ड येथे १९६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व १९७० रोजी त्याचे काम पूर्ण झाले. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या संग्रहालयासाठी पुढे जागेची कमतरता भासू लागली. त्यामुळे पुरातत्त्व विभागाकडून २००९ रोजी हजेरी माळावर संग्रहालयाच्या नवीन इमारतीच्या कामास प्रारंभ झाला.
दोन वर्षांपूर्वी ही इमारत इतिहासप्रेमींसाठी खुली झाली. पहिल्या टप्प्यात तख्त, शस्त्र, नाणी दालन, आर्ट गॅलरी खुली करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात वस्त्र, संकीर्ण व चित्र ही तीन दालने सुरू केली जातील. या दालनातील अंतर्गत कामे, वस्तूंची मांडणी पूर्ण झाली असल्याची माहिती अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली.
संग्रहालयाचा आढावा...
- हजेरी माळ मैदानावर संग्रहालय उभारणीचा निर्णय
- शासनाकडून ५ फेब्रुवारी २००७ रोजी मान्यता
- २००९ साली प्रत्यक्षात काम सुरू
- २५ हजार स्क्वेअर फूट बांधकाम
- २०२३ साली काम पूर्णत्वास
- २५०० ऐतिहासिक वस्तूंचा संग्रहालयात संग्रह
साताऱ्यातील संग्रहालयात अनेक शिवकालीन तसेच पुरातन वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने संग्रहालयातील दालने सुरू केली जात आहेत. काही दिवसांत वस्त्र, संकीर्ण व चित्र ही दालने सुरू होती. त्यामुळे इतिहासप्रेमींना या ऐतिहासिक वस्तू तसेच किल्ल्यांच्या प्रतिकृती एकाच वेळी पाहता येतील. - प्रवीण शिंदे, अभीरक्षक, वस्तुसंग्रहालय, सातारा