‘मातोश्री’त बसून गप्पा मारणाऱ्यांनी मोदींवर टीका करू नये, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:52 IST2023-06-23T12:51:14+5:302023-06-23T12:52:18+5:30
मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!

‘मातोश्री’त बसून गप्पा मारणाऱ्यांनी मोदींवर टीका करू नये, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला
कऱ्हाड (जि. सातारा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे कधी मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी गेले होते का? की कधी ते मंत्रालयात गेले? मातोश्रीत बसूनच ज्यांनी कारभार केला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
येथील कल्याणी मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेल्यावर काहींनी मणिपूर सांभाळता येत नाही, ते अमेरिकेला गेलेत, अशी टीका केली होती. मात्र, मणिपूर सांभाळायला गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. मातोश्रीवर बसून गप्पा मारणाऱ्यांनी मणिपूरची काळजी करू नये. मोदींनी लस तयार केली, असे मी म्हणालो होतो. आणि मी त्याचे समर्थन करतोय. लसीचा कच्चा माल काही ठरावीक देशांमध्येच उपलब्ध होता. मात्र, मोदींच्या संबंधामुळे तो कच्चा माल भारताला मिळाला. त्यानंतरच शास्त्रज्ञांनी लस तयार केली. १४० कोटी लोकांना मोफत लस मोदींमुळेच मिळाली आहे.’
मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!
अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे धोरण आखले आणि जे निर्णय घेतले, त्या धोरणांमुळेच आता साखर कारखाने आज जिवंत आहेत. साखर कारखानदारी, ऊस उत्पादक यामुळेच वाचली आहे. शेतकऱ्यांच्या विविध विकासासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारही आता सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.