देशसेवेसाठी सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही, परमवीर चक्र विजेते संजय कुमार यांचे मत
By प्रमोद सुकरे | Updated: August 27, 2022 15:59 IST2022-08-27T15:56:52+5:302022-08-27T15:59:02+5:30
कराड : देशसेवा करण्यासाठी फक्त सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी काम करता ...

देशसेवेसाठी सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही, परमवीर चक्र विजेते संजय कुमार यांचे मत
कराड : देशसेवा करण्यासाठी फक्त सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी काम करता ते काम प्रामाणिकपणे केले तरी ती देशसेवाच असते. असे मत परमवीर चक्र विजेते सभेदार, मेजर संजय कुमार यांनी व्यक्त केले.
परमवीर चक्र विजेते संजय कुमार एका कार्यक्रमासाठी कराडात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अशोक गुजर, डॉ. माधुरी गुजर, डॉ. माधव कुमठेकर, प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला आदींची उपस्थित होते.
संजय कुमार म्हणाले, देशाच्या सरहद्दीवर सीमांचे रक्षण करणे हे आमचे मुख्य काम आहे. भारतीय सैन्य दलाने आजवर या सीमारेषा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशासतसे उत्तर दिले आहे. आपली सेना कधीही पाठीमागे हटलेली नाही. त्यामुळे भारताची जी हद्द आहे ती आज आपल्या ताब्यात आहे आणि भविष्यातही ताब्यात राहतील.
काश्मीर युद्धातील अनुभव कथन करताना ते म्हणाले, आमचे शत्रू खूप उंचीवर जाऊन बसले होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त उंचावर जाऊन आम्हाला त्यांच्याशी सामना करावा लागला. परिणामी तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मात्र या सगळ्यावर मात करीत भारतीय सैन्याने शत्रूला गारद केले. आपला जो प्रदेश ते घेऊ पाहत होते तो पुन्हा ताब्यात घेतला.
अग्निपथ योजना चांगलीच
सैन्य दलामध्ये भरतीसाठी सुरू करण्यात आलेली नवी अग्निपथ योजना ही चांगलीच आहे. ती किती आणि कशी चालली आहे याचे प्रत्यंतर काही काळ गेल्यानंतर समोर येईल असेही संजय कुमार यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.