सातारा : लग्नानंतर अवघ्या सहाव्या दिवशी नवरी मुलीने मी विवाहित असून, मला दोन मुले आहेत, असे सांगून पळ काढला. नवविवाहित ४४ वर्षीय व्यक्तीने माहिती घेतली असता, २ लाख ७५ हजारांना त्याला फसविल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन महिलांसह दोन पुरुषांना अटक केली.जयश्री दत्तू शिंदे (रा. चिखली, ता. हवेली), शशिकला जाधव (रा. चिखली, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम), गजानन डावखोरे, सुमित्रा गजानन डाखोरे, गोकूळ लोंढे (सर्व रा. तांदूळवाडी, साेलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ४४ वर्षीय व्यक्तीचे लग्न जुळविण्याचे प्रयत्न सुरू होते. कुरवली (ता. फलटण) येथील ओळखीच्या बट्टू गोरे या व्यक्तीने संबंधित नवरदेवाची ओळख छाया साठे (रा. आळंदी, पुणे) या महिलेशी करून दिली. त्यानंतर छाया साठे हिने तिची साथीदार जयश्री शिंदे (रा. चिखली, ता. हवेली, जि. पुणे) हिच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा गैरफायदा घेऊन त्यांना फसविण्याचा कट रचला.विवाहित असलेल्या दीपाली प्रभू जाणे (रा. पाटणादेवी रोड, रोशननगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या विवाहित महिलेशी संबंधित व्यक्तीशी आळंदी येथे लग्न लावून दिले. या मोबदल्यात संशयितांनी २ लाख ७५ हजारांची रोकड घेतली. पोलिसांनी संशयितांना सापळा रचून फलटण येथे अटक केली.
Satara: लग्नाच्या सहाव्या दिवशी नवरी पळाली, पावणेतीन लाखांना गंडा; पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:51 IST