‘जात-धर्मा’च्या भिंती तुटणार; ‘अंनिस’चे आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र, जोडीदार शोधणे होणार सोपे
By नितीन काळेल | Updated: July 22, 2025 20:39 IST2025-07-22T20:38:45+5:302025-07-22T20:39:29+5:30
Marriage Bureau News: सध्या जात आणि धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी असे जोडीदार शोधणेही अवघड झालेले आहे.

‘जात-धर्मा’च्या भिंती तुटणार; ‘अंनिस’चे आंतरधर्मीय वधू-वर सूचक केंद्र, जोडीदार शोधणे होणार सोपे
- नितीन काळेल
सातारा - सध्या जात आणि धर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी असे जोडीदार शोधणेही अवघड झालेले आहे. या पार्श्वभूमीवर जात-धर्मातील भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून ‘अंनिस’ने राज्यस्तरीय आंतरजातीय व धर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरू केले आहे. महाराष्ट्रातील हे पहिले केंद्र ठरणार आहे.
‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे ‘जात ही एक मोठी अंधश्रद्धा आहे’ असे म्हणत. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ही ‘आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात झाले तर जाती निर्मूलन लवकर होईल’ असे मानत. त्यानुसार गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावत आहे. आजअखेर असे शेकडो विवाह अंनिसमार्फत राज्यभर लावण्यात आले आहेत. अशा विवाह करणाऱ्या मुला-मुलींचे महाराष्ट्रातील पहिले सुरक्षित निवारा केंद्र जिल्ह्यातील रहिमतपूर (सेफ हाऊस) येथे सुरू आहे.
‘अंनिस’ने आता सुरू केलेल्या वधू-वर सूचक केंद्रामध्ये वधू-वरांनी किंवा पालकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सुयोग्य स्थळ सुचवले जाते. वधू-वराने आपली माहिती पाठवल्यानंतर त्यांनी जोडीदाराची निवड विचारपूर्वक केली आहे ना याची पडताळणीही करण्यात येते. सत्यशोधकी तसेच विशेष विवाह नोंदणी कायदा याच्या अंतर्गत विवाह करावा असा सल्ला दिला जातो. नाव नोंदणीची सेवा ही विनामूल्य दिली जाते. आज समाजामध्ये प्रत्येक जातीची वेगवेगळी वधू-वर सूचक केंद्रे आहेत. परंतु, जात-धर्म न मानणाऱ्या पालकांना किंवा वधू-वरांना जर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करायचा असेल तर त्यांना असे केंद्र कुठेही नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही सोय महाराष्ट्रात पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे.
इच्छुकांनी संपर्क साधावा
आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच विधवा- विधुर विवाह करू इच्छिणाऱ्यांनी आपली माहिती केंद्राचे समन्वयक शंकर कणसे ( मुपो. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे, बारामती यांना पाठवावी, किंवा आपल्या गावातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, मिलिंद देशमुख, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर, डॉ.अशोक कदम, राजीव देशपांडे, प्रकाश घादगिणे, मुंजाजी कांबळे, विनोद वायंगणकर, फारुख गवंडी, अण्णा कडलासकर यांनी केले आहे.