गाव करी ते राव काय करी!, 'मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी' गावकऱ्यांनी एका दिवसात जमा केले 'एक कोटी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 17:40 IST2022-10-26T17:34:18+5:302022-10-26T17:40:04+5:30
गावकऱ्यांनी श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि शाळेसाठी खोल्या बांधण्याचा केला निर्धार

गाव करी ते राव काय करी!, 'मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी' गावकऱ्यांनी एका दिवसात जमा केले 'एक कोटी'
साहिल शहा
कोरेगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व आले पिकाच्या व्यापारासाठी अग्रगण्य बाजारपेठ म्हणून खेड नांदगिरी गावची ओळख. गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सर्वच राजकीय नेतेमंडळीसह ग्रामस्थांनी पक्ष विरहित एकत्र येऊन केला. अन् म्हणतो ना 'गाव करी ते राव काय करी' तसचं घडलं. आज, बुधवारी सकाळी मंदिराचा जीर्णोद्धारासाठी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत तब्बल एक कोटी ३७ लाख २४० रुपयांची देणगी जमा झाली. ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आहे.
गावातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार आणि शाळेसाठी खोल्या बांधण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी नजिकच्या काळात होऊ घातलेली ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यादृष्टीने पहिली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यातच भैरवनाथ मंदिरासमोरील पटांगणावर झाली होती. त्यामध्ये सर्वांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून श्री भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची शपथ ग्रहण केली होती.
बुधवारी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. खेड नांदगिरी, बर्गेवाडी, गणेश स्थळ व चंचळी येथील ग्रामस्थ व भाविक भक्तांची बैठक झाली. त्यामध्ये श्री भैरवनाथ मंदिर जीर्णोद्धाराचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला. सुमारे सव्वा दोन ते अडीच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून देणगी संकलनास सुरुवात होत असल्याचे जाहीर करण्यात आले. बघता बघता एक कोटी ३७ लाख २४० रुपयांची देणगी जमा देखील झाली. नजीकच्या काळात ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणखी देणगी जमा होणार असून लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या काम सुरू केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.