Women's Day Special: कचरा डेपोत चाकरी तरच पोटाला ‘भाकरी’!; सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा संघर्ष थांबता थांबेना

By सचिन काकडे | Updated: March 8, 2025 18:42 IST2025-03-08T18:41:05+5:302025-03-08T18:42:15+5:30

अनेक महिलांचं निम्मं आयुष्य डेपोतच

The struggle of women garbage collectors in Satara district continues unabated | Women's Day Special: कचरा डेपोत चाकरी तरच पोटाला ‘भाकरी’!; सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा संघर्ष थांबता थांबेना

Women's Day Special: कचरा डेपोत चाकरी तरच पोटाला ‘भाकरी’!; सातारा जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांचा संघर्ष थांबता थांबेना

सचिन काकडे

सातारा : पहाटे उठणं, हातात पोतं घेऊन कचरा डेपोवर जाणं, हजारो टन कचऱ्यातून विक्रीयोग्य साहित्य गोळा करणं, ते विकणं अन् मिळालेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकणं हा महिला कचरा वेचकांचा दिनक्रम. जिल्ह्यासह सातारा शहरात आज हजारो महिला दोन-तीन दशकांपासून हे काम करीत आहेत; परंतु ‘भाकरी’साठी नशिबी आलेला त्यांचा संघर्ष अजूनही थांबलेला नाही.

जिल्ह्यात कचरा वेचक महिलांची संख्या सात हजारांहून अधिक आहे. कोणी आघाताने, कोणी लिहिता-वाचना येत नसल्याने तर कोणी परिस्थितीमुळे कचरावेचकाचे काम पत्करले. ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तींचा सामना करत या महिला कचरा डेपोत दिवसभर राबत असतात. जिथं आपण क्षणभरही उभं राहू शकत नाही, अशा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात या महिला आठ-दहा तास राबतात. विक्रीयोग्य साहित्य मिळालेच तर त्याचे किती पैसे मिळतील हेही त्यांना ठावूक नसतं. 

मात्र, मिळालेल्या पैशातून आपला संसार व मुलांचं शिक्षण त्या पूर्ण करतात. कचरा वेचताना त्यांना अनेक यातना, जखमाही होतात; पण ‘पोटा’पुढे या जखमा काहीच नाहीत, असेही त्या सांगतात. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न बाळगता केवळ ‘भाकरी’साठी झुंझणाऱ्या हा घटक आजही सर्वच बाबतींत दुर्लक्षित अन् उपेक्षित आहे. एकीकडे महिला सबलीकरणाचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे आपलं संपूर्ण आयुष्य कचरा डेपोत व्यथित करणाऱ्या या स्वच्छतादूतांकडे मात्र प्रशासकीय यंत्रणेचेही दुर्लक्ष झाले आहे.

एवढंच सुख नशिबी..

कचरा वेचक महिला कामगार हा सर्वांत दुर्लक्षित घटक असला तरी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी साताऱ्यातील सर्व कचरा वेचक श्रमिक संघटना, ‘आस्था’ या संस्था पुढे येत असतात. आरोग्य शिबिर व अन्य उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढत असतात. इतकेच काय ते सुख या महिलांच्या वाट्याला येते.

कचरा वेचक म्हणून काम करणे कोणाला आवडते; परंतु परिस्थिती अशी ओढावली की हे काम पत्करावं लागलं. माझ्या दोन्ही मुली लहान होत्या तेव्हा पती सोडून गेले. कुटुंबावर मोठा आघात झाला; पण मी खचले नाही. झोपडी बांधली. कचरा वेचून मी दोन्ही मुलींचे पालनपोषण केले. परिस्थितीचे चटके सहन करून त्यांना शिक्षण दिले. एका मुलीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दोन्ही मुली आज संसाराला लागल्या. माझ्यासारख्या कित्येक महिला असा संघर्ष करत आहेत. शासनाने अशा महिलांना पाठबळ द्यायला हवं. - लाडाबाई चव्हाण, कचरावेचक, सातारा

Web Title: The struggle of women garbage collectors in Satara district continues unabated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.