Phaltan Doctor Death: शूरांच्या साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचे ‘मौन’; संवेदनशीलतेपेक्षा राजकारण झाले महत्त्वाचे
By सचिन काकडे | Updated: November 3, 2025 16:25 IST2025-11-03T16:23:44+5:302025-11-03T16:25:20+5:30
चिखलफेक करण्यात रस

Phaltan Doctor Death: शूरांच्या साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचे ‘मौन’; संवेदनशीलतेपेक्षा राजकारण झाले महत्त्वाचे
सचिन काकडे
सातारा : फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या निंदनीय घटनेने अवघे समाजमन हेलावले आहे. तरीही या गंभीर विषयावर साताऱ्यातील लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन अत्यंत धक्कादायक आहे. हे मौन पाहून शूरांच्या जिल्ह्यात संवेदनशीलता हरवली आहे की, त्यांना फक्त राजकारणच महत्त्वाचे वाटते, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. या गंभीर आणि क्लेशकारक घटनेची दखल घेत विविध सामाजिक संस्था आणि संघटना आक्रमक झाल्या. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलने झाली, पीडित महिलेच्या गावात निषेध मोर्चे निघाले. राज्यभरातील राजकीय व्यक्तींनीही या घटनेचा तीव्र निषेध करत दुःख व्यक्त केले.
या सगळ्या घडामोडींमध्ये एक अत्यंत खटकणारी बाब समोर आली आहे, ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मौन. खासदार उदयनराजे भोसले यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना हा विषय गांभीर्याचा वाटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया तर दूरच; पण किमान त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी साधी मागणी करण्याची संवेदनशीलता कोणी दाखवलेली नाही.
चिखलफेक करण्यात रस...
विशेष म्हणजे, ज्या फलटण तालुक्यात ही घटना घडली, त्याच तालुक्यात मूळ विषयाला बगल देत या विषयाचे गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. पीडितेला न्याय मिळण्याऐवजी, लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत आणि जुने वाद व वादाची प्रकरणे नव्याने समोर आणली जात आहेत.
नागरिकांनाच पडले प्रश्न?
- या सर्व घडामोडी पाहता साताऱ्यातील लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता नेमकी कुठे हरपली आहे?
- इतक्या संवेदनशील प्रश्नावर व्यक्त न होणे, हे सातारकरांच्या पचनी पडलेले नाही.
- श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत.
- राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते निष्पक्ष तपासाची मागणी का करीत नाहीत.