सातारा जिल्ह्याचा पारा घसरला; महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:05 IST2025-01-03T13:05:11+5:302025-01-03T13:05:27+5:30

तीन दिवसांत किमान तापमानात मोठा उतार

The minimum temperature of Satara dropped by four degrees The intensity of the cold began to increase | सातारा जिल्ह्याचा पारा घसरला; महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली

सातारा जिल्ह्याचा पारा घसरला; महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली

सातारा : जिल्ह्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे. यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या मध्यावर थंडीचा कडाका पडला होता. त्यातच उत्तर भागातून शीतलहर होती. त्यामुळे किमान तापमानात सतत उतार येत गेला. परिणामी सातारा शहराचा पारा ९.५ अंशांपर्यंत घसरला होता. हे तापमान मागील तीन वर्षांतील नीच्चांकी ठरले होते. याचदरम्यान, जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचेही किमान तापमान ११ अंशांपर्यंत उरतले होते. यामुळे थंडीची लाट आल्यासारखी स्थिती होती. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही हुडहुडी भरून येत होती.

परिणामी शेतीच्या कामावर मोठा परिणाम झाला होता. शेतकरी सकाळी ११ नंतरच शेतात जाऊन कामे उरकत होते. तसेच जिल्ह्यातील मोठ्या शहरातील बाजारपेठांवरही परिणाम झालेला. रात्री आठनंतर दुकानात तर तुरळक प्रमाणात खरेदी व्हायची. जिल्ह्यात सलग चार दिवस पारा १० ते १२ अंशांदरम्यान होता. त्यानंतर मात्र, किमान तापमानात वाढ होत गेली.
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर पडलेली थंडी नंतर कमी झाली. २१ डिसेंबरपासून किमान तापमान वाढत गेले.

सातारा शहराचा पारा तर १९ अंशांवर गेला होता. तर महाबळेश्वरचेही किमान तापमान वाढून १६ अंशांपर्यंत पोहोचलेले. त्यामुळे थंडी कमी झाल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. चार दिवसांत किमान तापमानात तीन ते चार अंशांचा उतार आला आहे. गुरुवारी सातारा शहरात १४.८ तर महाबळेश्वर येथे १३.८ अंशाची नोंद झाली. यामुळे गारठा चांगलाच वाढला आहे. परिणामी सकाळी फिरण्यास जाणाऱ्यांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यातच जिल्ह्यात आणखी काही दिवस थंडीची तीव्रता राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीशी सामना करावा लागणार आहे.

महाबळेश्वर शहराचे किमान तापमान असे..

दि. २१ डिसेंबर १३.८, २२ डिसेंबर १४.२, २३ डिसेंबर १३.६, २४ डिसेंबर १४.६, २५ डिसेंबर १४.८, २६ डिसेंबर १५.९, २७ डिसेंबर १६.१, २८ डिसेंबर १६, २९ डिसेंबर १५.६, ३० डिसेंबर १५.५, ३१ डिसेंबर १५, १ जानेवारी १४.५ आणि २ जानेवारी १३.८

Web Title: The minimum temperature of Satara dropped by four degrees The intensity of the cold began to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.