संजय पाटीलकऱ्हाड : मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. चोरट्यांची नजर दानपेटीपर्यंत आणि हात गाभाऱ्यापर्यंत पोहोचल्याने मंदिरे असुरक्षित बनली असून, मंदिरांची सुरक्षा केवळ कुलपावर अवलंबून आहे. पोलिसांकडून वारंवार सूचना करूनही ट्रस्टसह विश्वस्त दुर्लक्ष करीत असल्याने चोरीच्या घटना घडत आहेत.कऱ्हाड तालुक्यातील कोरेगाव येथील मंदिराची दानपेटी फोडून चोरट्याने रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असले तरी चोरट्यांचे हात दानपेटीपर्यंत पोहोचतातच कसे, हा प्रश्न आहे. वास्तविक, मंदिरात चोरीच्या घटना वारंवार घडतात. मात्र, तरीही या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. अनेकवेळा चोरटे देवी-देवतांच्या पितळेच्या अथवा इतर धातूच्या मूर्तीच चोरून नेतात, तर काहीवेळा निरंजन, समई, घंटा यासह मिळेल ते साहित्य लंपास करतात.तालुक्यातील बहुतांश मंदिरांमध्ये आत्तापर्यंत एकदा तरी चोरीची घटना घडली आहे. काही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मात्र, काहीवेळा चोरीस गेलेली वस्तू अथवा रक्कम किरकोळ स्वरूपात असल्यामुळे त्याची पोलिस दप्तरी नोंद होत नाही. तसेच ज्या चोरीच्या घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचतात, त्याचा तपासही अखेरपर्यंत होत नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटना
- कोळेवाडीतील मंदिरात दोनवेळा चोरीचा प्रकार
- तारळेतील मंदिरातून देवाच्या पितळेच्या मूर्ती चोरीस
- तळबीड येथे मंदिरातील प्रभावळ चोरीस गेली होती
- वाहगावमध्ये मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली.
- कऱ्हाडातील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठात भरदिवसा चोरी
- कऱ्हाडातील कमानी मारुती मंदिरातील दानपेटी फोडली.
- कोरेगावात मंदिरातील दानपेटी चोरण्यात आली.
पोलिसांनी सुचविलेल्या उपाययोजना
- मंदिरात रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी.
- प्रवेशद्वाराला लोखंडी शटर, मजबूत दरवाजा असावा.
- रात्रीच्या वेळी मंदिर कुलूपबंद केल्याची खात्री करावी.
- मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
- देवस्थान मोठे असेल तर सुरक्षारक्षक नेमावेत.
पोलिसांच्या हद्दीतील मंदिरे..
- १२९ - कऱ्हाड शहर
- १४५ - कऱ्हाड ग्रामीण
कऱ्हाडातील पेठनिहाय मंदिरे११ : सोमवार पेठ३ : मंगळवार पेठ२ : बुधवार पेठ१० : गुरुवार पेठ६ : शुक्रवार पेठ१६ : शनिवार पेठ२ : रविवार पेठ(उर्वरित मंदिरे त्रिशंकूसह ग्रामीण भागात)
कऱ्हाड तालुक्यातील महत्त्वाची मंदिरे
- खंडोबा देवस्थान, पाल
- श्रीराम मंदिर, तळबीड
- भैरवनाथ मंदिर, वहागाव
- धानाई मंदिर, कार्वे
- कृष्णाबाई मंदिर, कऱ्हाड
- दैत्यनिवारणी मंदिर, कऱ्हाड
- उत्तरालक्ष्मी मंदिर, कऱ्हाड
- जोतिबा मंदिर, कऱ्हाड
- गणेश मंदिर, कोळेवाडी
- महादेव मंदिर, रेठरे बुद्रूक
- रेणुका मंदिर, खोडशी
- महादेव मंदिर, गोटे