Satara: ऐतिहासिक वाघनखे लवकरच घेणार राजधानीचा निरोप, नागपूरकडे सुपुर्द केली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:05 IST2025-01-13T13:03:16+5:302025-01-13T13:05:59+5:30
प्रदर्शन सुरू झाल्यापासून राज्यभरातील तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला भेट दिली

Satara: ऐतिहासिक वाघनखे लवकरच घेणार राजधानीचा निरोप, नागपूरकडे सुपुर्द केली जाणार
सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखे लवकरच राजधानीचा निरोप घेणार आहेत. दि. ३१ जानेवारीपर्यंत ही वाघनखे शिवप्रेमींना पाहता येणार असून, यानंतर ती नागपूर येथील संग्रहालयात विसावा घेणार आहेत.
लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात दि. १९ जुलै रोजी दाखल झाली. दि. २० जुलैपासून ही वाघनखे तसेच संग्रहालयातील शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले. प्रदर्शन सुरू झाल्यापासून राज्यभरातील तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला भेट दिली. तसेच सामाजिक, कला, राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, शिवकालीन शस्त्र, मुद्रा आदींचा इतिहास जाणून घेतला.
या वाघनखांचा संग्रहालयातील कालावधी दि. ३१ जानेवारीला पूर्ण होत असून, यानंतर ही वाघनखे नागपूर येथील संग्रहालयाकडे सुपुर्द केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आणखी २० दिवस वाघनखे संग्रहालयात पाहता येणार आहेत.