सांगलीच्या शिलेदाराने साकारलेल्या ‘त्या’ किल्ल्यांची ‘युनेस्को’ला भुरळ!
By सचिन काकडे | Updated: July 14, 2025 14:39 IST2025-07-14T14:39:00+5:302025-07-14T14:39:36+5:30
बारा गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे साताऱ्यातील संग्रहालयात संवर्धन

सांगलीच्या शिलेदाराने साकारलेल्या ‘त्या’ किल्ल्यांची ‘युनेस्को’ला भुरळ!
सचिन काकडे
सातारा : महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा गड-किल्ले आता जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट झाले आहेत. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात महाराष्ट्राने दिमाखदारपणे सादर केलेल्या या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींनी ‘युनेस्को’च्या दोन हजार सदस्यांनाही थक्क केले. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे शिवधनुष्य पेलले आहे सांगली येथील आंतरराष्ट्रीय मॉडेल मेकर आणि कलाशिक्षक रमेश बलुरगी यांनी. त्यांच्या या कलाकृतींचे सध्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे.
‘युनेस्को’ला सादर केलेली किल्ल्यांची प्रतिकृती..
‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत नुकताच महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. यात सातारा जिल्ह्यातील प्रतापगड तसेच रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृती दिल्लीतील ‘युनेस्को’च्या अधिवेशनात सादर करण्यात आल्या होत्या. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, उपाध्यक्ष ऋषिकेश यादव आणि त्यांच्या चमूने या प्रतिकृती ‘युनेस्को’समोर सादर केल्या. ‘युनेस्को’च्या सदस्यांनी या कलाकृतींचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यांचे कौतुक केले.
एकाही किल्ल्यावर न जाता हुबेहूब प्रतिकृती
- रमेश बलुरगी (हरिपूर) हे सांगलीतील श्रीमती सुंदराबाई दगडे हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापैकी एकाही किल्ल्याला प्रत्यक्षात भेट दिली नाही.
- अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी ड्रोनच्या मदतीने घेतलेले स्कॅनिंग आणि अचूक मोजमाप, तसेच आपली अचाट कल्पनाशक्ती वापरून त्यांनी या प्रतिकृती साकारल्या.
- या प्रतिकृती इतक्या जिवंत आहेत की, त्या पाहिल्यावर खऱ्या किल्ल्यांची भव्यता आणि बारीकसारीक रचना लक्षात येते.
- ७ ऑगस्ट २०२४ रोजी या प्रतिकृती दिल्लीहून साताऱ्यातील संग्रहालयात आणण्यात आल्या.
कलाकृती निर्मितीची प्रक्रिया..
कागदाचा लगदा, ॲक्रेलिक रंग, फेव्हिकोल, सनबोर्ड आणि लाकडाचा भुसा यांसारख्या साहित्याचा वापर करून हे किल्ले तयार करण्यात आले. रायगड आणि राजगड या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे वजन सुमारे ३५० किलो असून, इतर किल्ल्यांचे वजन ८० ते १५० किलो आहे. त्यांची सोयीस्कर वाहतूक करता यावी, यासाठी चाके लावलेल्या लोखंडी फ्रेमचा वापर करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचं भाग्य मला मिळालं, याचा मनस्वी आनंद आहे. ही संधी दिल्याबद्दल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचा मी खूप-खूप ऋणी आहे. - रमेश बलुरगी, आर्किटेक्ट मॉडेल मेकर आणि कलाशिक्षक, (हरिपूर) सांगली
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळात समावेश झाला. ही बाब खरोखरच गौरवास्पद आहे. किल्ल्यांचे संवर्धन आता अधिक गतीने करता येईल. युनेस्कोला सादर करण्यात आलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे संग्रहालयात पुरातत्वीय निकषाप्रमाणे संवर्धन केले आले आहे. - प्रवीण शिंदे, संग्रहालय अभिरक्षक