शत्रू कमजोर पण कपटी, सावध राहा; साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:29 IST2025-10-16T12:28:27+5:302025-10-16T12:29:12+5:30
त्यांनी बिस्किटचा पुडाही दिला का?

शत्रू कमजोर पण कपटी, सावध राहा; साताऱ्यात कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचा सल्ला
सातारा : मागील निवडणुका मोठ्या फरकाने जिंकलो असलो, तरी अजून लढाई संपलेली नाही. शत्रू कमजोर असला तरी कपटी आहे, म्हणून सावध राहा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकसभेचा पाया आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांप्रमाणे बारकाईने नियोजन करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला, तसेच विरोधकांनी नको ते खाल्ल्यामुळे जनतेने त्यांचे कंबरडे मोडले, आता हंबरडा फोडून काय उपयोग, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.
सातारा येथे जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात बुधवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार सुहास बाबर, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, नवी मुंबईचे संपर्कप्रमुख अंकुश कदम, राजेंद्र यादव, रणजित भोसले, शारदा जाधव, यशराज देसाई, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यापासून मला ‘घटनाबाह्य मुख्यमंत्री’ म्हणत सरकार पडणार असे सातत्याने हिणवले जात होते; पण जनतेने माझे काम पाहून मला संधी दिली आणि विरोधकांना फेकून दिले, ते त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. तुम्ही कितीही आरोप केले, तरी मी आरोपांना कामाने उत्तर देतो. किती पैसे कमावले त्यापेक्षा किती माणसे कमावली, हे महत्त्वाचे, असेही शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींमुळे ते बुकिंग रद्द...
लाडक्या बहिणींना दुष्ट भावांपासून सावध राहण्याचे आवाहन मी केले. मग बहिणींनीही इतिहास घडवला. महाविकास आघाडीने आधीच मंत्रिमंडळ ठरवले होते, फाइव्ह-स्टार हॉटेल्स बुक केली होती; परंतु लाडक्या बहिणींनी ते बुकिंगच रद्द केले आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याचा निर्णय दिला,’ असेही शिंदे म्हणाले.
त्यांनी बिस्किटचा पुडाही दिला का?
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना अनेक ट्रक भरून मदतही पाठवली. शिवाय शासनानेही ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे; परंतु विरोधकांनी मदतीच्या पाकिटावरील फोटोबाबत आम्हाला हिणवले. त्यांनी साधा बिस्किटचा पुडासुद्धा दिला का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवाल शिंदे यांनी केला.