सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर'

By प्रमोद सुकरे | Updated: January 21, 2025 12:03 IST2025-01-21T12:02:25+5:302025-01-21T12:03:21+5:30

'भाजप'च्या गोटात अस्वस्थता!

The election of ShivSena Shambhuraj Desai as the guardian minister of Satar has angered the BJP | सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर'

सातारच्या पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य'पुन्हा 'शंभूराजां'च्याच हाती!; शिवेंद्रराजे होते 'आतुर' पण मिळाले 'लातुर'

प्रमोद सुकरे

कराड : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तरीही मुख्यमंत्री कोणाचा? यावरुन सरकार स्थापनेला अन त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला बराच वेळ गेला.पण त्यात सातारा जिल्ह्याला इतिहासात प्रथमच एकाचवेळी चार कँबिनेट मंत्रीपदे मिळाली.त्यामुळे जिल्हा सुखावला असला तरी सातारच्या पालकमंत्री पदाचं चौघांचाही जीव अडकला होता. पालकमंत्रीपदाचं घोडं महिनाभर अडलं होतं. पण पालकमंत्रीपदाचं 'शिवधनुष्य' पुन्हा एकदा 'शंभुराजा'च्या हातात दिले गेल्याने शिवसैनिकांच्यात मोठा आनंद दिसत आहे.

सातारा जिल्हा हा आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात यंदाच्या निवडणुकीत ८ ही मतदारसंघात महायुतीने बाजी मारली. त्यात सर्वाधिक ४ आमदार भाजपचे, २ शिवसेनेचे तर २ राष्ट्रवादी कचे विजय झाले. तर मंत्रिमंडळात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवसेनेचे शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांची वर्णी लागली. कॅबिनेट मंत्री झालेले हे चारही आमदार मातब्बर असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर या चौघांचाही डोळा होता. या माध्यमातून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळावी असे प्रत्येकाला वाटत होते.मात्र थेट त्यावर कोणीच बोलत नव्हते.

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सातारचे पालकमंत्रीपद द्यावे अशी जाहीर मागणी केल्याने इतरांची गोची झाली होती. याबाबत इतर मंत्र्यांना विचारले असता हा निर्णय वरिष्ठ घेतील एवढेच सांगत सावध भूमिका ते मांडत होते. पण जिल्ह्यात भाजपची ४ आमदार असल्याने, त्यातील २ दोन मंत्री असल्याने पालकमंत्री भाजपचा होईल. त्यातल्या त्यात खासदार 'उदयनराजें'नी मागणी केल्यामुळे ही संधी सातारच्या शिवेंद्रराजेंनाच मिळेल अशी चर्चा जोर धरू लागली होती.

मात्र शनिवारी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली. त्यात सातारच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शंभुराज देसाईंवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच शिवसैनिकांच्यात आनंदी वातावरण दिसत आहे. सातारसाठी सर्वात जास्त 'आतुर' असणाऱ्या शिवेंद्रराजेंना 'लातूर' तर जयाभाऊंना सातारा नसले तरी त्यांच्या लोकसभा मतदार संघाशी निगडित 'सोलापूर' जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांना बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे.

अनुभवाचा व ज्येष्ठत्वाचा फायदा झाला 

सातारा जिल्ह्यामध्ये ४ कॅबिनेट मंत्री झाली असली तरी शंभूराज देसाई वगळता इतर तिघेही प्रथमच मंत्री झाले आहेत. मंत्री देसाईंना मंत्रीपदाचा व सातारच्या पालकमंत्री पदाचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यातच ते ज्येष्ठ मंत्री असल्याचा फायदा त्यांना पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी झाला असल्याचे बोलले जातेय.

'भाजप'च्या गोटात अस्वस्थता!

शिवसेनेचे नेते 'शंभूराज' देसाईंना सातारचे पालकमंत्री केल्यानंतर  जिल्ह्यातील भाजपच्या गोटात मात्र काहीशी अस्वस्थता दिसत आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष भाजप असताना, भाजपचे ४ आमदार अन दोन कँबिनेट मंत्री असताना त्यापैकी एकाला पालकमंत्री पद मिळायला हवे होते.अशी भावना भाजपचे अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title: The election of ShivSena Shambhuraj Desai as the guardian minister of Satar has angered the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.