सातारा : नवीन आयकर कायदा आणि संरक्षण दलाच्या अनुषंगाने दिल्लीत बैठका असल्याने राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवार यांनी कोणत्या संदर्भाने वक्तव्य केले आहे, हे पाहावे लागेल. परंतु, दोन्ही गट एकत्र आणण्याबाबत मी एकटी निर्णय घेऊ शकत नाही. कार्यकर्त्यांशी बोलावे लागणार आहे व सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात दिली.सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी सत्तेसाेबत जाण्याबाबत सूतोवाच केल्याचे माझ्या पाहण्यात आले नाही. याबाबत सविस्तर माहिती घेऊन नंतर याबाबत बोलेन. दाेन्ही पक्षांचे कार्यकर्ते कार्यक्रमात एकत्र येत असतात. यामुळे त्यांच्यात उत्साह असेल तर ते चांगलेच आहे.मात्र, निर्णय सर्वांना विचारून घ्यावा लागेल. भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीत एक जबाबदार भारतीय म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने भारत सरकार व भारतीय सैन्यांच्या पाठीशी आहोत. यात कोणतेही राजकारण नाही.
एकत्र येण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून, सुप्रिया सुळे यांनी दिली स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:24 IST