मुख्यमंत्र्यांनी कोयना धरण पूररेषेत कोणतेही बांधकाम केले नाही; शंभूराज देसाईंची माहिती

By दीपक शिंदे | Published: December 31, 2022 08:10 PM2022-12-31T20:10:28+5:302022-12-31T20:10:49+5:30

मेडिकल कॉलेज भंगार चोरीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार

The Chief Minister Eknath Shinde did not undertake any construction in the flood line of Koyna Dam; About Shambhuraj Desai | मुख्यमंत्र्यांनी कोयना धरण पूररेषेत कोणतेही बांधकाम केले नाही; शंभूराज देसाईंची माहिती

मुख्यमंत्र्यांनी कोयना धरण पूररेषेत कोणतेही बांधकाम केले नाही; शंभूराज देसाईंची माहिती

Next

सातारा : सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेच्या बांधकामाच्या निविदेमध्येच जुने बांधकाम पाडण्याबाबत नमूद केले आहे काय, तपासून घेऊन त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. विधिमंडळात याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारने जे आश्वासन दिले आहे, त्याप्रमाणे पूर्तता करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देसाई यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेतील भंगार साहित्याच्या चोरीबाबत शंभूराज देसाई म्हणाले, ज्यावेळी जलसंपदाने जागा मेडिकल कॉलेजकडे हस्तांतरित केली त्यावेळी जागेवरील सर्व इमारतींसह दिली आहे का? टेंडर काढताना जुन्या इमारती उतरवून घेऊन नंतरच बांधकाम करण्याचे निविदेत आहे की नाही, हेही तपासून घेणार आहोत. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. यासंदर्भात आमदार शशिकांत शिंदे यांच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाला सरकारच्या वतीने जे उत्तर दिले आहे, त्याची माहिती घेऊन व दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई करू. आमदार महेश शिंदे यांनीही माध्यमिक शिक्षण विभागात ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याबाबतही सरकारने दिलेल्या उत्तरानुसार कारवाई करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोयना धरण पूररेषेत अतिक्रमण केल्याबाबत नोटीस बजावल्याबाबतची पोस्ट व्हायरल होत असल्याचे शंभूराज देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावी अनेकदा जाऊन आलो आहे. तेथे पूररेषेमध्ये कसलेही बांधकाम नाही. त्यांची शेतजमीन व घर यापासून पूररेषा खूप दूर आहे. त्यांच्याकडून कसलेही नियमबाह्य बांधकाम झाले नसल्याचे देसाई यांनी ठामपणे सांगितले.

नावली, ता. महाबळेश्वर येथे बिगरशेती जमिनीवरील बांधकामाबाबत अनिल परब यांनी केलेल्या आरोपाबाबत ते म्हणाले, मी कुठलेही गैरकाम केले नाही. माझे सर्व व्यवहार स्पष्ट आहेत. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे. दोन दिवसांत वकिलांशी चर्चा करून लवकरच कार्यवाही करणार आहे. ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्रीला परवानगीचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. कोविड काळात दोन वर्षांपासून स्थगित ठेवला. तोच आता लागू केल्याचे त्यांनी सांगितले.

सीमाप्रश्नाबाबत बोलताना शंभूराज देसाई खूप लहान असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. याबाबत देसाई म्हणाले, शरद पवार खूप मोठे नेते आहेत. त्यांच्यापुढे आम्ही लहान आहोत. पण, कामातून आम्ही शरद पवार यांना दाखवून देऊ की वयाने लहान असलो तरी चांगले काम करू शकतो. सत्तेचा गैरवापर करणारे हे सरकार नाही. ज्यांनी गुन्हा अथवा गैरव्यवहार केला असेल त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी होणार. चौकशी लागली की सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करणे बरोबर नाही, असेही देसाई म्हणाले.

Web Title: The Chief Minister Eknath Shinde did not undertake any construction in the flood line of Koyna Dam; About Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.