साहित्य संमेलन समाजाचे मन समृद्ध करते - शरणकुमार लिंबाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:32 IST2025-12-17T19:31:53+5:302025-12-17T19:32:21+5:30
हे संमेलन संपूर्ण जिल्ह्याची अस्मिता : शिवेंद्रसिंहराजे

साहित्य संमेलन समाजाचे मन समृद्ध करते - शरणकुमार लिंबाळे
सातारा : ‘साहित्य संमेलन म्हणजे केवळ लेखकांचा उत्सव नसून तो समाजाचा आरसा आहे. १८७८ साली न्यायमूर्ती, रानडे यांनी समाजप्रबोधनाच्या हेतूने लावलेले हे रोपटे आता शंभराव्या संमेलनाकडे दिमाखात वाटचाल करत आहे. पुस्तकांमध्ये माणसाचे मन आणि पर्यायाने जग बदलण्याची ताकद असते. साताऱ्यातील साहित्य संमेलन लोकांचे, देशाचे आणि समाजाचे मन समृद्ध करण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरेल,’ असा विश्वास ‘सरस्वती सन्मान’प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला.
साताऱ्यात दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ मंगळवारी (दि. १६) सकाळी शरणकुमार लिंबाळे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
लिंबाळे पुढे म्हणाले, ‘साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखकाला वाचक, प्रकाशक आणि रसिक अशा तिन्ही घटकांशी संवाद साधता येतो. हे संमेलन साहित्यिकांसाठी आत्मभान देणारे ठरेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद कुलकर्णी यांनी केले, तर सुनीताराजे पवार व नंदकुमार सावंत यांनी संमेलन यशस्वी करण्याची ग्वाही दिली.
हे संमेलन संपूर्ण जिल्ह्याची अस्मिता : शिवेंद्रसिंहराजे
‘९९ व्या संमेलनासाठी कोल्हापूर, इचलकरंजी आणि औदुंबर यांसारख्या शहरांची नावे शर्यतीत होती. मात्र, ‘मसाप’च्या सातारा शाखेने घेतलेल्या परिश्रमांमुळे हा बहुमान सातारा नगरीला मिळाला आहे. हे संमेलन केवळ शहरापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण जिल्ह्याचे आहे. साहित्याच्या या महाकुंभात प्रत्येक जिल्हावासीयाने सहभागी व्हावे,’ असे आवाहन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘कृष्णकाठचा थाट’ दिसेल : प्रा. मिलिंद जोशी
९८ वे संमेलन देशाच्या राजधानीत झाले होते, तर ९९ वे संमेलन छत्रपतींच्या ऐतिहासिक राजधानीत होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होणारे हे पहिलेच अखिल भारतीय संमेलन आहे. संमेलने केवळ आर्थिक बळावर नाही, तर समाजाच्या योगदानावर यशस्वी होतात. सातारा जिल्ह्याने या संमेलनातून कृष्णकाठचा थाट काय असतो, हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे, असे आवाहन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.