Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:16 IST2025-12-10T18:15:12+5:302025-12-10T18:16:59+5:30
प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध

Satara: कराडला १५ ब च्या निवडणुकीची धाकधूक कायम!, उच्च न्यायालय सुनावणी झालीच नाही
कराड : कराड नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तेथेही त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. मात्र, तांत्रिक मुद्द्यावर २ डिसेंबर रोजी या जागेसाठीचे मतदान रद्द करण्यात येऊन ते २१ डिसेंबर रोजी निश्चित केले आहे. मात्र, तोवर पुन्हा संबंधित उमेदवार अखिल आंबेकरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्याबाबत मंगळवारी सुनावणी होती. मात्र, ती झालीच नाही. त्यामुळे बुधवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल नेमका काय लागणार? त्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार? याबाबत धाकधूक वाढली आहे.
याबाबत माहिती अशी की, कराड येथील प्रभाग १५ मधून अकिल आंबेकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरवला. त्यानंतर आंबेकरी यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. तेथेही त्यांचा अर्ज अवैधच ठरला. मात्र, न्यायालयाचा लागलेला निकाल व दरम्यान झालेले चिन्ह वाटप याबाबत काही तांत्रिक मुद्द्यावरती ही १५ ब ची निवडणूक आयोगाने पुढे ढकलली. ती आता २१ डिसेंबरला होणार आहे. त्याचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे.
दरम्यान, अकिल आंबेकरी यांनी ५ डिसेंबर रोजी मुंबई येथे उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने संबंधितांना नोटीस पाठविल्या होत्या. मंगळवार दि. ९ रोजी मुंबईत त्याची सुनावणी होती. मात्र, ही सुनावणी झाली नाही. त्यामुळे बुधवार, दि. १० रोजी सुनावणीची होण्याची शक्यता आहे.
सुनावणीत काय निर्णय?
दरम्यान, बुधवार, दि. १० रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असल्याने मुंबईतील सुनावणीत नेमका काय निर्णय होणार? याकडे कराडकरांच्या नजरा आहेत. त्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार आहे.
मी कराड पालिका निवडणुकीत १५ ‘ब’मधून अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अवैध ठरवत माझ्यावर अन्याय केला. म्हणून मी जिल्हा न्यायालयात दाद मागितली, पण न्याय मिळाला नाही. आता मी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, याबाबत मंगळवारी सुनावली होती. मात्र, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने ती होऊ शकली नाही. त्यामुळे बुधवार, दि. १० रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. - अकिल आंबेकरी, (अपीलकर्ते)