पालिकांच्या सत्तासंघर्षात राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची लढाई, सातारा जिल्ह्यात रणनीती कशी.. जाणून घ्या
By सचिन काकडे | Updated: September 18, 2025 19:49 IST2025-09-18T19:47:10+5:302025-09-18T19:49:14+5:30
स्थानिक आघाड्याही आजमावणार ताकद : आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष

पालिकांच्या सत्तासंघर्षात राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची लढाई, सातारा जिल्ह्यात रणनीती कशी.. जाणून घ्या
सचिन काकडे
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली. या निर्णयानंतर सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर व मलकापूर या नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीच्या सत्तासंघर्षात राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व पालिकांनी प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली. ३० सप्टेंबरला प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर, मतदार यादी अद्ययावतचा कार्यक्रम, नगराध्यक्षपदासह प्रभागांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर होईल. ही सोडत अनेक इच्छुकांचे भवितव्य ठरवणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यावरच खरी राजकीय समीकरणे समोर येतील.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
येत्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्ही गटांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्याही आपले आव्हान उभे करून निवडणुकीला आणखी अटीतटीची बनवतील. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून, पक्षांसाठी राजकीय दिशा ठरवणारी ठरू शकते.
कोणत्या पालिकेत, काय असेल रणनीती..
सातारा : साताऱ्याची निवडणूक यंदा विशेष लक्षवेधी होणार आहे. पालिकेसाठी खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अजूनही मनोमिलन झालेले नाही. त्याचा फायदा घेत महाविकास आघाडीने अंतर्गत हालचाली सुरू केल्या असून सर्वांत मोठ्या आणि ५० नगरसेवक संख्या असलेल्या या पालिकेसाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सज्ज झाले आहेत.
कराड : यापूर्वी झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांनी पालिकेवर वर्चस्व निर्माण केले. मात्र, नगराध्यक्षपद भाजपच्या पारड्यात गेले. यंदा भाजप पालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जोरकस प्रयत्न करणार असून आगामी काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत.
महाबळेश्वर : थंड हवेच्या या शहरात यंदा राजकारण तापणार आहे. मंत्री मकरंद पाटील यांच्या आघाडीसमोर शिंदेसेनेचे माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी आव्हान उभे केले. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर आणि माजी नगरसेवक सुनील शिंदे तिसरी आघाडी उभी करून प्रस्थापितांना धक्का देण्याची शक्यता आहे.
मलकापूर : २०१९ साली काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर सत्ता स्थापन केली. मात्र, आताच्या राजकीय घडामोडी आणि भाजपचा वाढता प्रभाव पाहता, यंदा काँग्रेससमोर भाजपचे मोठे आव्हान उभे राहील असे चित्र आहे.
फलटण : फलटणमध्ये रामराजे गटाचे अनेक जुने कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. तरीही यंदाची निवडणूक राजे गट आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटातच होण्याची शक्यता आहे. राजे गटाने पालिकेत सलग सात वेळा सत्ता मिळवली. यंदा ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी जोरदार रणनीती आखली जात आहे.
रहिमतपूर : भाजपच्या चित्रलेखा माने-कदम, मंत्री जयकुमार गोरे गटाचे नीलेश माने, आमदार मनोज घोरपडे यांच्या विचाराचे व भाजपचे मंडल अध्यक्ष रणजित माने व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू वासुदेव माने हे एकत्र येऊन राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याविरोधात लढू शकतात, अशी चर्चा आहे. परंतु नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित झाले, तर येथील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.
पाचगणी : या निवडणुकीत प्रत्येकवेळी स्थानिक आघाड्या एकमेकांपुढे आव्हान उभे करतात. यंदाही मंत्री मकरंद पाटील यांचे नेतृत्व मानणारे जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, शेखर कासुर्डे यांनी जोरदार तयारी केली. ऐनवेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर या समीकरण बदलू शकतात.
वाई : वाई हा मंत्री मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला आहे. या पालिकेवर निर्विवाद त्यांच्याच गटाचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, यंदाची निवडणूक महायुती म्हणून एकत्रीत लढविली जाणार की नाही? हे आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होईल.
म्हसवड : म्हसवड पालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होऊ शकतो. परंतु मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वबळाची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपला गट उभा करू शकते.तर महाविकास आघाडी इतर पक्षांची मोट बांधून दोघांना आव्हान देऊ शकते.