‘साहित्या’च्या मेळ्यात साताऱ्याच्या इतिहासाची अनुभूती!; संगम माहुली, अजिंक्यतारा, कास पठार चित्ररूपात अवतरणार
By सचिन काकडे | Updated: December 31, 2025 15:54 IST2025-12-31T15:51:12+5:302025-12-31T15:54:50+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: साहित्य रसिकांना साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैभवाची अनुभूती देणार

‘साहित्या’च्या मेळ्यात साताऱ्याच्या इतिहासाची अनुभूती!; संगम माहुली, अजिंक्यतारा, कास पठार चित्ररूपात अवतरणार
सचिन काकडे
सातारा : साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, दि. १ जानेवारीपासून येथे साहित्याचा कुंभमेळा सुरू होत आहे. या संमेलनाचा मुख्य मंडपाकडे जाणारा मार्ग केवळ रस्ता नसून तो पुस्तकांच्या सानिध्यातून जाणारा एक साहित्यिक प्रवास असणार आहे.
मुख्य सभा मंडपाच्या सभोवती संगम माहुलीचा पुरातन घाट, सज्जनगडाचे ऐतिहासिक प्रवेशद्वार, किल्ले अजिंक्यतारा आणि जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार यांच्या विलोभनीय प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. हा परिसर साहित्य रसिकांना साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैभवाची अनुभूती देणार आहे.
तुळशी वृंदावन स्वरूपात मुख्य व्यासपीठ
संमेलनाचा मुख्य डायस जिथून विचारांची देवाणघेवाण होईल, तो अत्यंत कल्पकतेने साकारला आहे. हा डायस ‘तुळशी वृंदावनाच्या’ धर्तीवर तयार करण्यात आला असून, दुरून पाहिल्यावर साक्षात तुळशी वृंदावनच भासावे, अशी त्याची रचना आहे. भारतीय संस्कृतीतील पावित्र्याचे प्रतीक असलेल्या या रचनेमुळे व्यासपीठाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक झळाळी प्राप्त झाली आहे.
साताऱ्याची जलसंस्कृती
प्रवेशद्वारातून आत येताच साहित्यप्रेमींचे स्वागत साताऱ्याच्या ऐतिहासिक पाणी व्यवस्थेने होईल. सातारा शहराला पाणीपुरवठा कसा आणि कुठून झाला, याची इत्यंभूत माहिती चित्ररूपाने येथे मांडण्यात येत आहे. विशेष म्हणजे, येथे साकारलेली एक पारंपरिक विहीर येणाऱ्या प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, ती शहराच्या जलव्यवस्थेची आठवण करून देईल.
ऐतिहासिक वाड्यांचे वैभव आणि नक्षीकाम
मुख्य मंडपाकडे जाताना रसिक एखाद्या ऐतिहासिक वाड्यातून चालत असल्याचा अनुभव घेतील. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना जुने वाडे आणि राजवाड्यांप्रमाणे नक्षीकाम केलेल्या कमानी उभारण्यात येत आहेत. ही रचना साहित्यप्रेमींना वाडा संस्कृतीचा भास निर्माण करून देणारी ठरेल.
आठवणींचे पोस्ट कार्ड
डिजिटल युगात हरवत चाललेल्या संवादाच्या साधनांना उजाळा देण्यासाठी येथे आगळावेगळा ‘सेल्फी पॉईंट’उभारण्यात येत आहे. एकेकाळी संवादाचे प्रमुख माध्यम असलेले खाकी पोस्ट कार्ड येथे सेल्फी पॉईंटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. जुन्या आठवणींचा धागा पकडत साकारलेले हे पोस्ट कार्ड संमेलनाला येणाऱ्या तरुण आणि ज्येष्ठ अशा दोन्ही पिढ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.