सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाट्यानजीक एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने घुसलेल्या टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत एका मोटारसायकला चिरडले. या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री साडेआठ वाजता झालेल्या या अपघातानंतर टेम्पोचालक गाडी सोडून फरार झाला.शिवाजी केसू राठोड (वय २२, सध्या रा. कोडोली, मळाई-जानाई मंदिराच्या पाठीमागे, मूळ रा. उटगी लमाणतांडा, ता. जत, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे तर सायबा राजू चव्हाण (वय ३०), सोहम राजू चव्हाण (वय २ वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. रविवारी रात्री कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेला आयशर टेम्पो (एमएच १२ एचडी ८८८५) वाढे फाट्याजवळ आल्यानंतर रस्ता दुभाजक ओलांडून अकस्मातपणे एकेरी रस्त्यावर विरुद्ध दिशेने घुसला. यावेळी रस्ता ओलांडण्यासाठी उभारलेल्या अनेक वाहनांना या टेम्पोने भरधाव वेगात धडक दिली. याच ठिकाणी शिवाजी हा आपली बहीण सायबा व भाचा सोहम या दोघाला घेऊन मोटारसायकलवरून निघाला होता. टेम्पोने चिरडल्यामुळे शिवाजी जागीच ठार झाला. सायबा पुढच्या चाकाखाली सापडली तर सोहम मागच्या चाकात अडकला. यानंतरही चालकाने टेम्पो तसाच पुढे दामटला. काही फूट पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्याला धडकून टेम्पो थांबला. यानंतर टेम्पोचालक तत्काळ फरार झाला.
वाढे फाट्यावर गर्दीत टेम्पो घुसला !
By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST