सोप्या भाषेत प्रबोधन करून बालकांची काळजी घ्यावी : गौडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:59+5:302021-06-16T04:50:59+5:30
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर बालकांचे त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करून विशेष काळजी घ्यावी,’ असे ...

सोप्या भाषेत प्रबोधन करून बालकांची काळजी घ्यावी : गौडा
सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर बालकांचे त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करून विशेष काळजी घ्यावी,’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी म्हटले आहे की, ‘आपण विविध पातळ्यांवर प्रयत्न करून कोरोनावर मात करीत आहोत. ‘माझे मूल, माझी जबाबदारी’ अशी विशेष मोहीम शासनाने सुरू केली आहे. प्रशासन ती प्रभावीपणे राबवीत आहे. सर्वच पातळ्यांवर ही मोहीम आपणास यशस्वी करावयाची आहे. बालकांचे संरक्षण खूप महत्त्वाचे असून तेच भारताचे भवितव्य आहे.
प्रशासनाला समाज तसेच प्रसारमाध्यमांचीही उत्तम साथ मिळत आहे. यापुढे कोरोनाची तिसरी लाट येऊ नये अथवा तिचा प्रभाव खूप कमी असावा, असे प्रयत्न असणार आहेत. तरीही संभाव्यता लक्षात घेऊन बालकांचे आरोग्य जपावे. त्यांना समजेल अशा सोप्या शब्दांत त्यांचे प्रबोधन करावे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर बाळगणे, गर्दी न करणे, घराबाहेर खेळायला सोडल्यावर विशेष काळजी घेण्याबाबत सूचना देणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आदी बाबी त्यांना आपुलकीने समजून सांगाव्यात. आरोग्याच्या दृष्टीने आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.
आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण आदी विभागांसह महसूल खाते आणि पोलीस कोरोनावर मात करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांना जनतेची साथ लाभत आहे. ग्रामसुरक्षा समित्यांना नागरिकांनी बळ द्यावे आणि बालकांचे प्रबोधन ग्रामीण भागात करण्यात ग्रामसुरक्षा समित्यांनी विशेष भूमिका बजवावी, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.