डोंगरी भागातील जनतेला शहरी भागाचा गोडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST2021-05-19T04:40:11+5:302021-05-19T04:40:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरात नोंद करूनदेखील सर्वसामान्यांना लस मिळत नाही; पण वशिलेबाज यांनी केलेल्या सेटिंगनुसार त्यांना ग्रामीण ...

डोंगरी भागातील जनतेला शहरी भागाचा गोडवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शहरात नोंद करूनदेखील सर्वसामान्यांना लस मिळत नाही; पण वशिलेबाज यांनी केलेल्या सेटिंगनुसार त्यांना ग्रामीण भागात जाऊन सहजरित्या लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे डोंगरी भागातील जनतेला शहरी भागाचा गोडवा लागल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात आहे. कोरोना महामारीमुळे दर १० वर्षांनंतर करण्यात येणारी जनगणनादेखील झालेली नसल्याने नेमका आकडा उपलब्ध नसला तरी लोकसंख्या ३५ लाखांच्यावर आहे. कोरोना महामारीचा संसर्ग रोखून लोकांचे जीव वाचविण्यासाठी लसीकरण अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्यातील केवळ ६ लाख ८४ हजार ९६३ इतक्या लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. लस घेण्यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. लसी मिळत नसल्याने लोकांचे हेलपाटे होत आहेत. लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिली तरीदेखील त्यावर कारवाई केली जात नाही.
विशेषतः शहरांमध्ये लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सातारा शहरांमध्ये केवळ तीन लसीकरण केंद्रे आहेत. शहर आजूबाजूची उपनगरे यांची मिळून लोकसंख्या ५ लाखांच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या जनतेसाठी केवळ तीन लसीकरण केंद्रे आहेत. प्रशासनाने सर्वच ठिकाणी वॉर्डनिहाय लसीकरण मोहीम राबवली तर सध्या गर्दी होते किंवा लोकांचे हेलपाटे होतात, ते होणार नाहीत आणि त्याचा संसर्गदेखील रोखता येऊ शकतो. एवढी सोपी बाब प्रशासनाच्या नजरेस आणूनदेखील प्रशासन ढिम्म आहे.
या पार्श्वभूमीवर ज्याचा कुठला वशिला नाही आर्थिक परिस्थिती बेताची आहे, असे लोक शासकीय लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. तिथे लस संपल्याचा निरोप मिळाल्यानंतर मूग गिळून घरी परतत आहेत. ही परिस्थिती एका बाजूला असताना ज्यांची प्रशासनात ओळख आहे, राजकीय पोच आहे, नात्यातले कोणी आरोग्य विभागात कामाला आहे तर अशा लोकांना सहजरित्या लस मिळते. लसीकरणासाठी वशिलेबाजी करणारे लोक वाहने घेऊन ग्रामीण भागात विशेषतः दुर्गम भागांमध्ये जात आहेत. रस्त्यावर फिरायला बंदी असतानादेखील यांची वाहने एक तालुका बदलून दुसऱ्या तालुक्यात जातात. तरीदेखील प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून आहे.
ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध केलेल्या लसीवर शहरी भागातील लोक हक्क गाजवत असल्याचे चित्र असून असेच सुरू राहिले तर गोरगरिबांना लसी कशा मिळणार आणि लस मिळाली नाही म्हणून त्यांचे जीव जात राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लसींची व्यवस्था कुठे केली जाते?
पाटण, जावळी, महाबळेश्वर या दुर्गम तालुक्यांमधील आरोग्य केंद्रात आधीच वशिला लावला जातो. ऑनलाईन नोंदणी केली की कुणी कुठेही लस घेऊ शकतो, त्यामुळे शहरात नोंद करायची; पण खेड्यात जाऊन लस घ्यायची, असा प्रकार सुरू आहे. या प्रकारामध्ये आरोग्य यंत्रणेतील काही जण आपले पितळ पिवळे करून घेत आहेत.