महिलांच्या आरोग्यासाठी शाश्वत आणि कृतिशील उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST2021-08-29T04:36:54+5:302021-08-29T04:36:54+5:30
संडे मुलाखत इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, जे देशभरात विशेषत: ग्रामीण भारतात प्रत्येकापर्यंत जोडले गेलेय. ...

महिलांच्या आरोग्यासाठी शाश्वत आणि कृतिशील उपक्रम
संडे मुलाखत
इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, जे देशभरात विशेषत: ग्रामीण भारतात प्रत्येकापर्यंत जोडले गेलेय. महिलांच्या मासिक पाळीत समाजाला सामावून घ्यायचे असेल, तर पोस्ट कार्यालयांशिवाय पर्याय नाही. महिलांच्या आरोग्यासाठी शासकीय पातळीवर घेतलेल्या या पावलाला सातारकर साथ देतील, याची खात्री आहे.
- अपराजिता म्रिधा, प्रवर अधीक्षिका, सातारा डाक विभाग
प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा डाक विभाग महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी पूरक अशा सॅनिटरी नॅपकिन ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून डाक कार्यालयात उपलब्ध करून देत आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कृतिशील उपक्रम राबविणाऱ्या सातारा डाक विभागाच्या प्रवर अधीक्षिका अपराजिता म्रिधा यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : पोस्टात नॅपकिन विक्री ही संकल्पना डोक्यात कशी आली?
उत्तर : सातारा जिल्ह्यात डाक कार्यालयांच्या दौऱ्यांच्या वेळी स्थानिक महिलांच्या आरोग्याविषयी विचार यायचे. जिथे स्वच्छ आंघोळीची सोय नाही, तिथे मासिक पाळीविषयी जागृतीचा विषयच खूप लांब आहे. हे ओळखून दिल्लीच्या संस्थांशी बोलून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
प्रश्न : मासिक पाळीचे गांभीर्य समाजात आहे असे वाटते?
उत्तर : मासिक पाळी हा अजूनही महिलांचाच विषय वाटतो. पाळी काळात मुलींची शाळेत गैरसोय होत असल्याने, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडावे लागणे, हे एकविसाव्या शतकातही आढळणे खेदाचे आहे. सामान्यांपासून ही चळवळ सुरू करण्यासाठी पोस्टातही सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्रश्न : ग्रामीण भागातील महिलांना नॅपकिन खरेदीसाठी पैसे मिळणार का?
उत्तर : महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग ही मोठी समस्या आहे. याचे मूळ कारण मासिक पाळीतील अस्वच्छता हेच आहे. ग्रामीण भागातील महिलांना नॅपकिन खरेदी नाही जमलं, तर स्वयंसेवी संस्थांना हाताशी घेऊन काही प्रायोजक बघून आम्ही हे महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू.
३६ टक्के महिलाच वापरतात नॅपकिन
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-२०१६ नुसार भारतात सुमारे ३३६ दशलक्ष मासिक पाळीधारक स्त्रियांपैकी फक्त ३६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिनचा वापरतात. उर्वरित महिला घरगुती पर्यायांवर अवलंबून राहत असल्याने त्यांच्यात आरोग्य समस्या वाढतात. समाजाचा घटक म्हणून ही संवेदनशीलता दाखविणे आवश्यक असल्याचे अपराजिता मानतात.
या ठिकाणी सुरू होणार उपक्रम
महिलांच्या स्वच्छतेच्या बाजूने प्रभावी भूमिका घेताना हा प्रकल्प सातारा प्रधान डाकघर, कऱ्हाड प्रधान डाकघर, वडूज, फलटण, पांचगणी, कोरेगाव, मेढा, पाटण, ढेबेवाडी येथे सुरू करण्यात येणार आहे.
...............