कऱ्हाडात तीन सख्ख्या लहानग्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 07:00 IST2020-12-19T03:38:12+5:302020-12-19T07:00:28+5:30

रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तीन मुलींचा मृत्यू झाला, तर आईची प्रकृती स्थिर

Suspicious death of three sisters in satara | कऱ्हाडात तीन सख्ख्या लहानग्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

कऱ्हाडात तीन सख्ख्या लहानग्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

कऱ्हाड (जि. सातारा) :  सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील तीन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. संबंधित मुलींच्या आईसह त्या तिघींना जेवणानंतर उलट्या झाल्या. रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तीन मुलींचा मृत्यू झाला, तर आईची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आयुषी सासवे (वय ३ वर्षे), आरूषी सासवे (८), आस्था शिवानंद सासवे (९) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. सैदापूर येथे मिलिटरी होस्टेलनजीक शिवानंद सासवे हे कुटुंबासह राहतात. शिवानंद यांना तीन मुली होत्या, तसेच एक मुलगाही आहे. सोमवारी सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर, रात्री सर्व जण झोपले. मध्यरात्री शिवानंद यांच्या पत्नीसह तिन्ही मुलींना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सैदापुरातील खासगी डॉक्टरांकडे नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून औषधे दिली. मात्र बुधवारी पहाटे आयुषी, आरूषी व आस्था या तिघींची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे तिघींना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. आस्था आणि आयुषी या दोघींचा त्याचदिवशी मृत्यू झाला, तर आरूषीचा गुरुवारी सकाळी तिचाही मृत्यू झाला. 
 

Web Title: Suspicious death of three sisters in satara