सातारा : कुत्र्याला वाचविताना नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा गाडीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.चंद्रकांत रघुनाथ सावंत (वय ४०, रा. खोकडवाडी, पो. कोडोली, सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रकांत सावंत हे दि. १९ रोजी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी नवीन औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर अचानक त्यांच्या दुचाकीला कुत्रे आडवे आले.
या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. कुत्र्याला ठोकर बसल्याने ते दुचाकीवरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.