नोंदणी कार्यालयात सनईचे सूर
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T22:31:48+5:302015-07-25T01:13:30+5:30
वाग्दत्तांसाठी वातावरणनिर्र्मिती : पश्चिम महाराष्ट्रात पहिलाच यशस्वी प्रयोग

नोंदणी कार्यालयात सनईचे सूर
प्रगती जाधव-पाटील - सातारा -नोंदणी पद्धतीने विवाह करताना विवाह इच्छुकांबरोबरच आलेल्या वऱ्हाडींना टिपिकल शासकीय वातावरणाचा अनुभव येऊ नये, यासाठी साताऱ्यात नामी शक्कल लढविण्यात आली आहे. येथील विवाह नोंदणी कार्यालयात विवाह सुरू असताना मंगल सनई चौघड्यांचा संगीत लावले जाते. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे वातावरण जाऊन मंगल कार्यालयाचा फिल येतो. असा प्रयोग करणारे सातारा हे पहिले केंद्र ठरले आहे.
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग असतो. तो सर्वांच्याच स्मृतीत राहावा, यासाठी कुटुंबे प्रयत्न करतात. डामडौल करून लग्न साजरे करण्याच्या प्रथेला फाटा देत काही कुटुंबीय नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा मार्ग स्वीकारतात. अशा वऱ्हाडींना विवाह नोंदणी कार्यालय अनेकदा रुक्ष वाटते. आधुनिक विचारसरणीचा अवलंब केलेल्या या कुटुंबीयांना विवाह प्रसंग साजरा केल्यासारखा वाटावा, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा लग्नाची नोंदणी सुरू असते, त्यावेळी कार्यालयातील अन्य विभागांचे काम थोड्या वेळासाठी थांबविण्यात येते.
विवाह नोंदणी सुरू झाल्यापासून गळ्यात मंगळसूत्र घालेपर्यंत संगणकावर मंद आवाजात चनईसे सूर वाजत असतात. काहीजण जागेच्या नोंदीसाठी आलेले लोकही
वऱ्हाडी बनून लग्नात सहभागी होतात.
शासकीय कार्यालयाचा बाज सोडून अधिकारी आणि कर्मचारीही वऱ्हाडींपैकी एक होऊन जातात. त्यामुळे लग्न लावताना येथे खूपच मोकळे वातावरण असल्याचे पाहायला मिळते. भविष्यात शहरी भागातील सुशिक्षितांनीही नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास प्रवृत्त व्हावे, अशी अपेक्षा कार्यालयातून व्यक्त केली जात आहे.
दोनशे रुपयांत लग्न
नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी केवळ दोनशे रुपयांचा खर्च येतो. लग्न जिल्ह्यातील व्यक्तींचे होणार असेल तर नोटीसचा खर्च पन्नास रुपये येतो. दोन जिल्ह्याात नोटीस पाठवायच्या असतील तर शंभर रुपये लागतात. विवाहनोंदणी कार्यालयाचे शुल्क १५० रुपये असते. अशा पद्धतीने केवळ दोनशे रुपयांत हे लग्न लागू शकते. कार्यालयाबाहेर जाऊन विवाह नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते.
ग्रामीण भागातील टक्का मोठा
नोंदणी विवाह करण्यासाठी ९९ टक्के लोक हे ग्रामीण भागातून येत असल्याची माहिती पुढे आली आहे. अशिक्षित म्हणून ग्रामीण भागातील लोकांकडे पाहून नाके मुरडणारे फक्त एक टक्का शहरी लोक नोंदणी पद्धतीने विवाह करतात. पारंपरिक पद्धतींना बाजूला सारून आधुनिक विचारसरणीची कास धरलेले सुजाण नागरिक ग्रामीण भागात असल्याचे वास्तव यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. शहरी भागातूनही नोंदणी विवाह वाढणे अपेक्षित आहे.