ऊसतोड मजूर सुगीच्या कामाला
By Admin | Updated: November 14, 2014 23:22 IST2014-11-14T22:33:56+5:302014-11-14T23:22:09+5:30
कारखाने बंद असल्याचा परिणाम : मजुरांवर उपासमारीची वेळ, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर

ऊसतोड मजूर सुगीच्या कामाला
कार्वे : कारखान्यासाठी ऊसतोड करणारे मजूर तालुक्यात ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. मात्र, कारखानेच सुरू नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच काही मजूर उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर भांगलणीसारख्या कामाला जात आहेत.
कऱ्हाड तालुक्यातील साखर कारखाने सुरू होण्यास विलंब होत आहे़ तशातच कारखान्याचे ऊसतोडणी मजूर कारखानास्थळावर तसेच विविध गटांवर दाखल झाले आहेत़ मात्र, अजूनही ऊसदराचा तिढा सुटलेला नाही.
शेतकरी संघटनेने ऊसदर जाहीर झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी उसाचा तोड घेऊ नये, असे आवाहन केले आहे. ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी शेतकरी संघटनेने कारखानदार व शासनाला काही दिवसांची मुदत दिली आहे.
या मुदतीत ऊसदर जाहीर झाल्यास कारखाने सुरळीत सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, दराची कोंडी न फुटल्यास पुन्हा आंदोलने होण्याची व त्यामुळे गळीत हंगामाला आणखीनच उशीर होण्याची शक्यता आहे.
सध्या ठिकठिकाणी ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. या मजुरांनी आपल्या झोपड्याही उभारल्या आहेत. मात्र, हंगामच सुरू झाला नसल्याने त्यांच्याकडे सध्या कसलेच काम नाही. कारखाना सुरू झाल्यानंतर या मजुरांना थोडेफार पैसे मिळतात. या पैशातूनच त्यांचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, सध्या कारखाने बंद असल्याने व हातालाही काम नसल्याने मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
उदरनिर्वाह चालविण्यासाठी सध्या काही शेतमजूर स्थानिक शेतकऱ्यांकडे रोजंदारीने कामावर जात आहेत. शिवारात भात काढणी, मळणी, भांगलणी तसेच सुगीच्या कामात मजूर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे़
मजुरांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे़ चारा उपलब्ध करण्यासाठी शिवारात जाऊन भाताच्या पेंड्या, उसाचा पाला, सोयाबीनचा भुस्सा आदी जमा करून चाऱ्याचा प्रश्न मजुरांना सोडवावा लागत आहे.
जे मजूर रोजंदारीवर कामाला जात आहेत, त्यांना तेथून थोडाफार चारा उपलब्ध होत आहे. मात्र, जे मजूर झोपड्यांच्या ठिकाणीच बसून आहेत, त्यांना जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्या मजुरांना जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ कारखान्याने गळीत सुरू करावे, अशी मागणी तोडणी मजुरांकडून होत आह़े़ (वार्ताहर)
निवारा शोधायचा कुठं ?
ऊसतोड मजुरांनी प्लास्टिकचा कागद झाकून झोपड्या तयार केल्या असल्या तरी झोपडीसाठी आवश्यक असणारा पालापाचोळा त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे फक्त लाकडी काठ्या उभ्या करून मजुरांनी त्यावर प्लास्टिक कागद अंथरले आहेत. त्यातून निवारा उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने या मजुरांच्या झोपड्या व त्यातील साहित्य पूर्णपणे भिजून गेले. रात्रीच्या वेळेस निवारा कुठे शोधायचा, या विवंचनेत मजूर आहेत.