महिलांच्या कलेतून सुगडी घेतात आकार!

By Admin | Updated: January 8, 2015 00:01 IST2015-01-07T21:49:09+5:302015-01-08T00:01:42+5:30

कुंभारवाड्यात लगबग सुरू : कच्चा माल आणणे अन् विक्रीची जबाबदारी पुरुषांकडे

Sugar from the women's art size! | महिलांच्या कलेतून सुगडी घेतात आकार!

महिलांच्या कलेतून सुगडी घेतात आकार!

कोंडवे : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी यशस्वी प्रवेश केल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते. मकरसंक्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या सुगडी बनविण्यामध्ये ही महिलाराज दिसत आहे. पुरुषांकडे कच्चा माल आणणे आणि विक्री करण्याची जबाबदारी सोपवून महिला सुगडी करण्यात व्यस्त झाल्या आहेत.
कुंभारवाड्यात डिसेंबर महिन्यापासूनच सुगड्या तयार करण्याची लगबग सुरू होते. पूर्वी घरातील महिलांना सुगड्या वाळवणे आणि रंगविणे हे दोन कामच दिले जात होते. त्यानंतर यात बदल होत महिला सुगड्या विक्रीसाठीही बाजारात दिसू लागल्या. अलीकडे अनेक कुंभारवाड्यातून सुगडी मॉल आणि महानगरांपर्यंत जाऊ लागली आहे. त्यामुळे कामाचा ताण कुंभारवाड्यात वाढत असल्याचे चित्र दिसते. यावर्षी वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत सुगड्या बाजारात उपलब्ध आहेत. विविध रंगसंगतीच्या या सुगड्या रंगविण्याचे काम सध्या कुंभारवाड्यात सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुगड्यांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुगड्यांसाठी आवश्यक असलेल्या मातीचे दर वाढल्याने ही वाढ करण्यात आली असल्याचे दत्तात्रय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

गेल्या काही वर्षांपासून आम्ही महिला सुगडी तयार करण्याचे काम करत आहोत. सुगडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला नाजूकपणा आणि वळणदारपणा महिलांच्या बोटांत असते. त्यामुळे आकर्षक आणि व्यवस्थित आकारात सुगडी करायची असेल तर त्या महिला उत्तम प्रकारे करू शकतात.
- सुभद्रा कुंंभार, सातारा



सुगड्यांवर खडे आणि लेसही...!
मार्केटिंगच्या आजच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुगड्यांना सजविण्यात येत आहे. आकर्षक रंगसंगती आणि उत्कृष्ट सजावट केली तरच या सुगड्यांना उठाव मिळतो. त्यामुळे रंगसंगती ठरविणे आणि सुगड्यांवर अंतिम हात फिरविण्याची जबाबदारी कलासक्त महिला घेतात. दूरचित्रवाणीवरील मालिकांचा प्रभावही सुगड्यांवर दिसतो. म्हणूनच सुगडी अधिक आकर्षित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच त्याच्यावर खडे आणि लेस लावण्यात आल्या आहेत. ही सुगडी यंदा बाजारात जास्त भाव खाणार, असा विश्वास सचिन कुंभार यांनी व्यक्त केला.


निर्यात करण्याकडे भर
साताऱ्यातील अनेक कुंभारवाड्यात सुगडी तयार केली जाते. त्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा अधिक असे चित्र दिसते. परिणामी शहरात या सुगड्यांना फारसा चांगला दर मिळत नाही. त्या तुलनेत महानगरांमध्ये चांगला दर मिळतो. शहरात विक्री करण्यास मर्यादा येत असल्यामुळे अनेक कुंभारवाड्यातून सुगडी निर्यात करण्यावर भर दिला जातो. यामुळे सुगड्यांना दरही चांगला मिळतो.

Web Title: Sugar from the women's art size!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.