अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकाची किर्गिस्तानमध्ये दंगल; सुधीर पुंडेकर स्पर्धेसाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 16:36 IST2022-04-05T16:26:10+5:302022-04-05T16:36:01+5:30
Sudhir Pundekar : किर्गिस्तान येथे होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी पुंडेकर सज्ज आहे.

अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या लेकाची किर्गिस्तानमध्ये दंगल; सुधीर पुंडेकर स्पर्धेसाठी सज्ज
सातारा - किर्गिस्तानची राजधानी असलेल्या बिसेक येथे १२ ते २० एप्रिल दरम्यान होणाऱ्या जागतिक कुस्ती संघटनेच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय बेस्ट रेसलिंग ग्रँड पिक्स स्पर्धेसाठी फलटण तालुक्यातील मुळीकवाडी येथील सुधीर पुंडेकर यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
फलटण तालुक्यातील मुळीकवाडी येथील शेतकरी कुटुंबातील सुधीर पुंडेकर हा कुस्तीगिर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने यश मिळवत आहे. भारतामध्ये बेल्ट रेसलिंग कुस्ती प्रकारात सुधीर खेळ दाखवणार आहे. किर्गिस्तान येथे होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेसाठी पुंडेकर सज्ज आहे. सुधीर हा बेल्ट रेसलिंग या कुस्ती प्रकाराला जागतिक कुस्ती संघटना व ऑलिम्पिक कौन्सलिंग ऑफ एशियाची मान्यता आहे. जागतिक पातळीवरील या कुस्तीचा इंडोअर आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश झाला आहे.
अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जात सुधीर पुंडेकर याने खेळातील सातत्य टिकवून ठेवले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करत आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा अभिमानाने फडकवला आहे.
जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये
तुर्कमेनीस्थानमध्ये २०१७मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुधीरने भारताचे प्रतिनिधीत्व केले. किर्गिस्तान देशाच्या ममाकझोरी कैराती या खेळाडूबरोबर कडवी झुंज दिली होती. या झुंजीने सुधीर पुंडेकर यांना जागतिक क्रमवारीत नववे स्थान मिळवून दिले.
आपली परिस्थिती सुधारणे आणि बदलणे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. बेल्ट कुस्तीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रवेश मिळवणं आव्हानात्मक होते. पण, जिद्द आणि सातत्य याच्या जोरावर हे यश मिळविणे शक्य झाले. माझ्या कर्तृत्त्वावर विश्वास ठेवून मला मदत करणाऱ्यांमुळे हे यश संपादन करणे शक्य झाले.
- सुधीर पुंडेकर, बेल्ट रेसलिंग खेळाडू