मलकापूर : भरधाव टेम्पोचा टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचा ताबा सुटून टेम्पो पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठार हद्दीत आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.अपघातस्थळी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक टेम्पो क्रमांक (एमएच ०९ - एफएल ०८९) मधून माल घेऊन कऱ्हाडच्या दिशेने येत होता. पुणे-बंगळुरू महामार्गावर दुपारी दीडच्या सुमारास वाठार हद्दीत आला असता, टेम्पोचा अचानक टायर फुटला. भरधाव वेगात अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर टेम्पो महामार्गावरच पलटला.या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. याची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अपघातग्रस्त टेम्पो बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
अचानक टायर फुटल्याने टेम्पो झाला पलटी, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:36 IST