सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला पट्टेरी वाघ, कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 11:21 IST2023-12-22T11:21:38+5:302023-12-22T11:21:49+5:30
वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला पट्टेरी वाघ, कॅमेऱ्यात कैद
कऱ्हाड (सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, प्रकल्पात ठिकठिकाणी पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळून आली आहे.
या प्रकल्पात शेकडो प्रकारचे प्राणी तसेच पक्षी वास्तव्यास आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा प्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते. सुरुवातीला वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात वाघांचे फोटो कैद झाले होते. अशातच प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाच्या पायांचे ठसे मिळाले. ही बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर यांच्या निदर्शनास आली.
वाघाचा अधिवास असल्याचे पुरावे हाती आल्यानंतर वन विभागाकडून प्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी १७ डिसेंबर रोजी पहाटे ४:५९ वाजता प्रकल्पात एका पट्टेरी वाघाचा वावर आढळून आला. या वाघाच्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.